आघाडीची सभा होणारच

आघाडीची सभा होणारच

महाविकास आघाडीकडून येत्या रविवारी २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र रामनवमीच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरच्या किराडपुरा भागात २ गटात झालेली हाणामारी, दगडफेक आणि वाहन जाळपोळीच्या घटनेनंतर या सभेला परवानगी मिळेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच या सभेला परवानगी द्यायची की नाही हा निर्णय पोलिसांचा आहे. पोलिसांनी नकार दिल्यास सभा होणार नाही, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येत होते, तर सभा होणारच, असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जात होता.

हे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच पोलिसांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली आहे. परवानगी देतानाच पोलिसांनी सभेच्या आयोजकांना १५ अटी घातल्या आहेत. पुण्यातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सभा घेण्याचे मविआने ठरवले आहे. त्यानुसार मविआची पहिली सभा संभाजीनगरमध्ये होत आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

सभेची पूर्ण तयारी झालेली आहे. रामनवमीच्या निमित्ताने झालेली दंगल हा सभेला गालबोट लावण्याचा प्रकार आहे. वातावरण तणावपूर्ण असल्याचे सांगून सभा रद्द करण्याची अफवा पसरवली जात असली तरीही महाविकास आघाडीची सभा कोणीही रोखू शकत नाही, सभा होणारच, अशी माहिती शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी येथे दिली. निवडणुका जिंकण्यासाठी या दंगली घडविल्या जात असून दंगलीचा हा नवा रामनवमी पॅटर्न आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी सभा ठरली आहे. तेथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत करावी. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सभा होणारच, अशी स्पष्टोक्ती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली.संजय राऊत यांचे छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे.

यापूर्वीदेखील राज्यात दंगली घडल्या तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना राऊतांसारखे बेताल वक्तव्य केले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात यापुढे जर पुन्हा दंगली घडल्या, तर संजय राऊत यांना गुन्हेगार करा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा घ्यावी, मात्र या सभेत संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर मविआची सभा कशी होईल हे मला माहिती नाही. या ठिकाणी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या वाचाळवीरांमुळे वातावरण बिघडू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीने सामाजिक सलोखा निर्माण करीत सभा घ्यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

सभेसाठी घातलेल्या काही अटी
* सभा संध्याकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेतच घ्या. सभेचे ठिकाण आणि वेळेत बदल करू नका.
* सभेसाठी येणार्‍यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये.
* सभेला येताना शस्त्र, तलवारी स्वत:जवळ बाळगू नये. शस्त्रांचे प्रदर्शन करू नये.
* सभास्थळावर कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. जास्त गर्दी जमवू नये.
* सभास्थळी ढकलाढकली, गोंधळ, चेंगाराचेंगरी निर्माण झाल्यास आयोजक जबाबदार राहतील.
* सभेमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. रस्ता बंद होऊ नये.
* सभेसाठी आलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याच्या सूचना द्याव्यात.
* सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल किंवा कार रॅली काढू नये.
* सभेसाठीच्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबत न्यायालयाच्या निर्देशांच्या मर्यादांचे पालन करावे.
* स्टेज उभारण्यासाठी आधी संबंधित ठेकेदाराने स्टॅबिलिटी प्रमाणपत्रे पोलिसांकडे सादर करावीत.

सभेसाठी यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार्‍या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.

सभेची पूर्ण तयारी झालेली आहे. वातावरण तणावपूर्ण असल्याचे सांगून सभा रद्द करण्याची अफवा पसरवली जात असली तरीही मविआची सभा कोणीही रोखू शकत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी या दंगली घडविल्या जात असून दंगलीचा हा नवा रामनवमी पॅटर्न आहे.संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

तुम्ही सभा रद्द करा, आम्ही यात्रा रद्द करु. संजय राऊत यांचे छत्रपती संभाजीनगर दंगलीप्रकरणी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे. त्यामुळे जर पुन्हा दंगली घडल्या, तर संजय राऊत यांना गुन्हेगार करा.
-चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी सभा ठरली आहे. तेथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत करावी. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सभा होणारच.-अजित पवार,
नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

First Published on: April 1, 2023 4:36 AM
Exit mobile version