MyMahanagar पत्रकार धमकी प्रकरण : झिशान सिद्दीकींचा काँग्रेसच्या जगताप, वाघमारेंकडून निषेध

MyMahanagar पत्रकार धमकी प्रकरण : झिशान सिद्दीकींचा काँग्रेसच्या जगताप, वाघमारेंकडून निषेध

‘माय महानगर’चे पत्रकार स्वप्निल जाधव यांना धमकावल्याप्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार झिशान सिद्दीकींचा काँग्रेसकडूनही निषेध करण्यात आला आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया ‘माय महानगर’कडे व्यक्त केल्या असून काँग्रेस पक्षानेही याबाबत निषेध व्यक्त केला असल्याचे म्हटले आहे, तर या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कानावरही हा विषय घालणार असल्याचे आश्वस्त केले आहे. पत्रकार स्वप्निल जाधव यांना धमकावल्याप्रकरणी काँग्रेस पक्षातंर्गतच निषेध होण्यास सुरुवात झाल्याने झिशान सिद्दीकी यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

झिशान सिद्दीकींचा काँग्रेसच्या जगताप, वाघमारेंकडून निषेध

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शुक्रवारी ‘माय महानगर’कडे या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाई जगताप यांनी याबाबत निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, या गोष्टीचे काँग्रेस पक्षाने कधीही समर्थन केलेले नाही. या गोष्टीचा निषेध काँग्रेसने केला आहे. मी सुद्धा या गोष्टीचा निषेध करतो. व्यक्तिगत काही गोष्टी असू शकतात, पण त्या कोणी सार्वजनिक करत असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. मी स्वतः सुद्धा पत्रकार होतो त्यामुळे मला काही गोष्टी माहित आहेत, पण काँग्रेसच्या विचार धारेत अशा गोष्टी बसत नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तर डॉ. राजू वाघमारे यांनी याप्रकरणी सांगितले की, धमकी प्रकरण माझ्या कानावर आले आहे. याबाबत मी स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या कानावर हा विषय घालणार आहे. या गोष्टींना आळा कसा घालता येईल आणि कशा रोखता येतील यावर निर्णय घेऊन कारवाई करू, असे आश्वस्त केले. पक्षातीलच दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करताना निषेध करत तसेच हा विषय प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालणार असे सांगितल्याने आमदार झिशान सिद्धिकींच्या अडचणींत वाढ होणार यात शंका नाही.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे आश्वासन

या प्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव यांनी सर्व उपस्थित पत्रकरांसमवेत पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

निश्चितपणे कारवाई करू –  शंभुराज देसाई

शंभुराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीला धक्काबुक्की किंवा दमदाटी झाली असेल. त्याचप्रमाणे दम देण्याचा प्रकार जर घडला असेल तर, तशी संबंधित तक्रार प्रतिनिधींनी पोलिसांना द्यावी. पोलीस सर्व प्रकारच्या बाबी तपासून घेतील. माध्यमांच्या व्यक्तींना दमदाटी करणारा कुणीही व्यक्ती असो, मग ती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा कुणीही असो त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करु, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

शेवटी माध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्त संकलन करण्यासाठी आणि ही माहिती सामान्य जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ते काम करत असतात. अनावधानानं घडलं असेल तर आम्ही समजू शकतो, पण जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित प्रतिनिधींनी तक्रार केली असेल तर त्यावर चौकशी करून निश्चितपणे कारवाई करू, असं शंभुराज देसाई म्हणाले.


हेही वाचा : MyMahanagar पत्रकार धमकी : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे


 

First Published on: June 9, 2023 9:27 PM
Exit mobile version