‘नजर महानगर’ची : फळांचा कृत्रिम गोडवा, मानवी आरोग्यासाठी धोका 

‘नजर महानगर’ची : फळांचा कृत्रिम गोडवा, मानवी आरोग्यासाठी धोका 

सुशांत किर्वे । नाशिक

उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक शीतपेय, फळे, आईसक्रीम, फ्रोझन डेझर्ट, एनर्जी ड्रिंक्स मोठया प्रमाणावर खरेदी करत आहेत. मात्र, नैसर्गिकरित्या आंबा न पिकवता कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी काही व्यापार्‍यांकडून घातक रसायनांचा वापर केला असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. आंबा कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. यामुळे अ‍ॅसिटीलिन गॅस तयार होऊन फळाला चांगला रंग येतो. मात्र, यामुळे तयार झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे किडनी व यकृतावर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले. बाजारात ग्राहकांची सर्वाधिक ऋतुनिहाय फळांना मागणी असते. मात्र, काही विक्रेते ही संधी साधत कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत आहेत. त्यामुळे फळे कृत्रिमरित्या लवकर पिकत असली तरी त्याचे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. नाशकात व्यापार्‍यांच्या मागणीनुसार कर्नाटक व गुजरातमधून कच्चा आंबा आला आहे. हा आंबा पिकवण्यासाठी शासनाने इथिलीनचा १०० पीपीएम वापर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, काही व्यापारी कच्चा आंबा पिकवण्यासाठी घातक कॅल्शियम कार्बाईड व इथिलिनचा अतिरिक्त प्रमाणात वापर करून ही फळे फ्रूटमार्केटमध्ये जादा दराने विकत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून फक्त गुणवत्ता तपासणीसाठी नमुने घेतले जातात. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने फळविक्रेत्यांचे फावते आहे. व्यापारी आणि विक्रेत्यांकडून केवळ हव्यासापोठी होत असलेले असे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१०० ‘पीपीएम’ला मान्यता, मात्र वापर अतिरिक्त

एखादे फळ नैसर्गिकरित्या पिकत असताना इथिलीन उत्सर्जित होते. याच इथिलीनचा वापर कच्चे फळ पिकवण्यासाठी केला जातो. मात्र, त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी इतर द्रव्याचा १०० ‘पीपीएम’ एवढी मात्रा वापरण्यास मान्यता दिली आहे. फळे पिकविण्यासाठी सुनियंत्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यास तसेच पिकांचा प्रकार व त्याची परिपक्वता लक्षात घेऊन इथेफॉन व इथेरील इत्यादींच्या वापरास परवानगी दिली आहे. या प्रक्रियेमुळे इथिलीन वायू हा फळातील स्वतःच्या इथिलीन वाढीसाठी उद्दीपित करतो. इथिलीन हा रंगहीन व ज्वलनशील वायू आहे.

नाशकात लॅबच नाही

 नाशिकमध्ये नमुने विश्लेषणासाठी एनएबीएल (नॅशनल अ‍ॅक्रीडिशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरी) प्रमाणित प्रयोगशाळा नसल्याने हे नमुने पुणे व मुंबईमधील लॅबमध्ये पाठविले जातात. नाशिकमध्ये लॅब सुरु करण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरु असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. अहवाल १४ दिवसांमध्ये मिळणे अपेक्षित असताना सहा महिन्यानंतर अहवाल मिळत आहेत. परिणामी, फळांमध्ये कॅल्शियम कार्बाईड वापर करणार्‍या विक्रेत्यांचे फावते आहे.

१११ अहवाल प्रलंबित

 फळांच्या गुणवत्ता तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. एफडीएच्या पथकाने शरदचंद्र पवार मार्केट, ओझर, मालेगाव आणि जऊळके (ता. दिंडोरी) येथे छापे टाकले. पथकाने या चार ठिकाणी नमुने तपासणीसाठी शीतपेयांसह एनर्जी ड्रिंक्सचा साठा ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत तब्बल ४७२ नमुने ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी १११ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे ९६, मुंबईतील प्रयोगशाळेत ८, पुणे प्रयोगशाळेत ७ अहवाल प्रलंबित आहेत.

मनुष्यबळाची कमतरता

उन्हाळ्यामुळे शीतपेय, आंबा, आईसक्रिम, कोल्डड्रिंक्सच्या मागणीमध्ये वाढ झाली असली तरी त्याची गुणवत्ता तपासणीसाठी अन्न व औषध विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. परिणामी, विक्रेत्यांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत. अवघ्या पाच अधिकार्‍यांवर कामकाज केले जात आहेत.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी फळांची खरेदी करताना अधिक काळजी घ्यावी. फळे घेतल्यानंतर ती धुवूनच खावीत. फळे कृत्रिमरित्या पिकवून त्यांची विक्री करणे हे खरेतर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे अशा गोष्टींबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

असे पिकवा घरच्या घरी आंबे

फ्रूटमार्केटमधून कच्चे आंबे आणल्यानंतर घरामधील एक जागा निवडावी. त्या जागेवर सुरुवातील जाड ऊबदार कपडा टाकावा. त्यावर गवत किंवा पाचट ठेवावे. त्यावर कच्चे आंबे ठेवावेत. त्या आंब्यांवर पुन्हा गवत किंवा पाचट ठेवावे. त्यावर जाड ऊबदार कपडा ठेवावा. दोन दिवसांनी पिकवण्यास ठेवलेल्या आंब्यांचा रंग पिवळसर दिसेल. शिवाय, त्या आंब्याच वास येईल.

असा ओळखा फरक

नेसर्गिकरित्या पिकवलेले आंबे

कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे

अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणी टाकले छापे

First Published on: May 2, 2023 1:31 PM
Exit mobile version