भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष, राणेंच्या दाव्यावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल

भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष, राणेंच्या दाव्यावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल

भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली असल्याचा टोला नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतीषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्याची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजप सरकार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजप सरकार येईल असे भाकीत केलं आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्च महिन्यात भाजपचे सरकार येईल असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या बोलण्यानुसार व्हावे असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकार जाईल आणि भाजपचे सरकार येईल असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : MLC election: नागपूरमध्ये काँग्रेसला अपेक्षित चमत्कार घडणार नाही, फडणवीसांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर


 

First Published on: November 26, 2021 9:12 PM
Exit mobile version