कुवत नसताना शिवसेना अयोध्येला निघाली – राणे

कुवत नसताना शिवसेना अयोध्येला निघाली – राणे

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आहे. कुवत नसताना शिवसेना अयोध्येला राम मंदिराच्या बांधणीसाठी निघाल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे बोलत असताना त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवह जोरदार हल्ला चढवला. नियोजित दौऱ्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असून त्यांच्या दौऱ्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न गाजत असून शिवसेनेनं चलो अयोध्येची घोषणा दिली आहे. त्यामुळे भाजपसमोरची डोकेदुखी देखील आणखी वाढली आहे. दरम्यान याच राम मंदिराच्या मुद्यावरून आता नाराणय राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

वाचा – #NoMandirNovote, राम मंदिरावरून पंतप्रधानांना आवाहन

राम मंदिर आणि राजकारण

२०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सत्तेत आल्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी करू असं आश्वासन दिलं होतं. पण, अद्याप देखील राम मंदिराबाबत कोणतीही हालचाल झालेली नसल्यानं भाजपला हिंदुत्ववादी संघटनेसह शिवसेनेनं देखील लक्ष्य केलं. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील राम मंदिरासाठी जमिन अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केल्यानं भाजपसमोरच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यापूर्वी काही संतांनी देखील अयोध्येतील राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच विहिंपनं देखील आता राम मंदिराच्या बांधणीसाठी शिवसेनेवर विश्वास दाखवल्यानं भाजपचा पाय आणखीन खोलात गेला आहे. या साऱ्या घडामोडी पाहता आता भाजप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून हिंदुत्ववादी मतांना भाजपनं २०१४ साली हात घातला होता. पण, आता मात्र राम मंदिराची उभारणी न झाल्यानं काही प्रमाणामध्ये नाराजी देखील दिसून येत आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.

वाचा – राम मंदिरासाठी आरएसएसची ९ डिसेंबरला मेगा रॅली

First Published on: November 13, 2018 12:38 PM
Exit mobile version