राहुल कनाल बोले आणि आदित्य ठाकरे डोले, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

राहुल कनाल बोले आणि आदित्य ठाकरे डोले, नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल आणि भाजपकडून विविध प्रकारची विधानं केली जात आहेत. त्यावरून महाविकास आघाडी आणि राज्य सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, हा वाद सुरू असतानाच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे राहुल कनाल यांनी ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आदित्य ठाकरे यांच्याशी केली आहे. दरम्यान, या विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. शिंदे गटातील ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राहुल कनाल आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

राहुल कनाल हे नाव तुम्ही ऐकलं असेल. राहुल कनाल बोले आणि आदित्य ठाकरे डोले अशी परिस्थिती शिवसेनेत आहे. ज्येष्ठ मंडळींना आणि आमदार, खासदारांना जी काही मंडळी आदेश देत होते. त्यात राहुल कनाल हे नाव आघाडीवर होतं. भावी आमदार, खासदार काहीही पक्षामध्ये संबंध नसताना शिर्डीसारख्या संस्थेवर नियुक्ती आणि संपूर्ण शिवसेना या धंदेवाईक लोकांच्या ताब्यात राहुल कनाल सारख्या लोकांना आदित्य ठाकरेंनी दिले होते. राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंना महाराजांची उपमा दिली आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अशी तुला तुम्ही कोणासोबत करताय?, हे कितपण योग्य आहे, असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या स्क्रिप्ट प्रमाणे ही शिवसेना सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राजकारण करताहेत त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि संजय राऊतांना सुद्धा माझा सवाल आहे की, आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे. सर्वसाधारण नवख्या मावळ्यां इतकी सुद्धा त्यांची कारकीर्द आहे का?, त्यांच्यासोबत तुलना करणं ही शोकांतिका आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाहीये का?, याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने करावा, असं नरेश म्हस्के म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान करणाऱ्या राहुल कनाल यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, तसेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिला आहे.


हेही वाचा : आता आदित्य ठाकरेंची छत्रपती शिवरायांशी तुलना, राहुल कनालच्या ट्विटमुळे संताप


 

First Published on: December 6, 2022 4:53 PM
Exit mobile version