नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला गती

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला गती

नाशिक : बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक तालुक्यातील चार गावांचे जमीनीचे दर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून घोषित केले जाणार आहे. तसेच सिन्नर तालुक्यातील १६ गावांतील संयुक्त मोजणीचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर तीन महिन्यांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा प्रश्न काहीसा साईड ट्रॅक झाला होता. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेताना केंद्राकडे रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला पुन्हा एकदा वेग आला. दरम्यान, महारेलकडून सिन्नर तालूक्यातील १६ गावांमध्ये प्रकल्पात काहीसा बदल सुचविला आहे. या बदलात काही ठिकाणी रेल्वेमार्गाचे क्षेत्र कमी तर काही गावात ते वाढीव होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सदर १६ गावांमधील संयुक्त मोजणी नव्याने सुरू केली आहे. येत्या १५ तारखेपर्यंत ते पूर्ण करण्याची डेडलाईन ठेवली आहे. नाशिक तालूक्यातील देवळाली, विहितगाव, बेलगव्हाण व संसारी या चार गावांमधील जमीन रेल्वेसाठी संपादित करायची आहे. मात्र, देवळालीवगळता उर्वरित तिन्ही गावांमध्ये शेतकरीविरूद्ध देवस्थान वाद असल्याने प्रशासनाने जमीनीचे दर घोषित करणे टाळले होते. सरकारने अखेर याप्रकरणी मध्यस्थी केल्यामुळे प्रकल्पाच्या मार्गाती विघ्न दूर झाले. त्यामुळे प्रशासनानेदेखील आता या चारही गावांचे दर जाहीर करण्याची तयारी केली आहे. पुढील आठवड्यात त्याबाबतची घोषणा केली जाणार असल्याने रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळणार आहे.

सिन्नरला ३० हेक्टर अधिग्रहण

नाशिक-पुणे रेल्वेसाठी नाशिक व सिन्नर तालूक्यातील २८४ हेक्टर जमीन अधिग्रहीत करायची आहे. त्यापैकी ३० हेक्टर क्षेत्र अधिग्रहण पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपतथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिकच्या तुलनेत नगरमध्ये १५ व पुण्यात केवळ १० हेक्टर क्षेत्राची खरेदी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नाशिक तालुक्यातील चार गावांचे दर पुढील आठवड्यात जाहीर केले जाणार आहेत. सिन्नरमधील १६ गावांमधील संयुक्त पुर्नमोजणीचे काम अंतिम टप्प्यात असून, ते १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. : गंगाथरण डी. जिल्हाधिकारी, नाशिक

First Published on: September 30, 2022 12:41 PM
Exit mobile version