शतकाच्या उंबरठ्यावर राज्यातील पहिलाच मालेगाव तालुका; दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू

शतकाच्या उंबरठ्यावर राज्यातील पहिलाच मालेगाव तालुका; दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू

मालेगावात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. बुधवारी (दि.22) मालेगावात दोन पॉझिटिव्ह व दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता एकूण 110 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून मालेगाव रुग्ण संख्येत शतकाच्या उंबरठ्यावर आहे. मालेगावमध्ये 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यांनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे शतक पूर्ण करणारा नाशिक हा राज्यातील चौथा जिल्हा आहे. तर मालेगाव हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या शतकाच्या उंबरठ्यावर असणारा राज्यातील पहिलाच तालुका आहे.

प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असतानाही नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित व मृत रुग्ण मालेगावात आहेत. मंगळवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालात मालेगावात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी मालेगावात दोन पॉझिटिव्ह रुग्णांचा व दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर मालेगावातील जीवन रुग्णालयात उपचार सुरू होते. 45 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिलेचा समावेश आहे. उर्वरित मृत दोन 32 व 45 वर्षीय संशयित रुग्ण आहेत. ते दोघेही बेलबाग परिसरातील असून  कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने सामान्य रुग्णालयात उपचार घेत होते. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांनी आत्महत्या केली आहे.

बुधवारी दिवसभरात 106 संशयित रुग्णांचे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास मिळालेले आहेत. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. 7 रिपोर्ट नाशिक जिल्हा रुग्णालय,  दोन रिपोर्ट नाशिक शहरातील खासगी रुग्णालय,  97 रिपोर्ट मालेगावात रुग्णालय, 3 डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व एक खासगी रुग्णालयातील आहे.

नाशिक कोरोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण 110

निगेटिव्ह रुग्ण 788

(मालेगाव 96, नाशिक शहर 10, नाशिक जिल्हा 04)

उपचार घेत असलेले रुग्ण 331

बरे झालेले रुग्ण 02

मृत रुग्ण 12

बुधवारी निगेटिव्ह आलेले रिपोर्ट 106

बुधवारी मालेगावात मृत झालेले रुग्ण 04

(दोन पॉझिटिव्ह, दोन संशयित )

First Published on: April 22, 2020 7:23 PM
Exit mobile version