अभिनेता झालो आणि सायन्समध्ये संशोधन करायचं राहून गेलं

अभिनेता झालो आणि सायन्समध्ये संशोधन करायचं राहून गेलं

नाशिक – आवडीतून अभिनयाचा छंद जडला आणि त्यातून अभिनेता बनलो. खरंतर मी विज्ञान विषयात संशोधन करणार होतो. मात्र, आयुष्यात दिशा बदलणारी माणसं भेटत गेली. रंगायन संस्थेच्या नाटकांचा प्रेक्षक होतो. पुढे त्यामुळे लोभ नसावा नाटकात सहभागी झालो. ते आयुष्यातील पहिले नाटक होते. त्यानंतर अनेक संधी मिळात गेल्या, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी जीवनप्रवास उलडला. त्यांची मुलाखत शिवानी जोशी यांनी घेतली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या पुरस्कारांचे सोमवारी (दि.२५) महाकवी कालिदास कलामंदिरात वितरण करण्यात आले. यावेळी वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार लेखक शफाअत खान, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार दिलीप प्रभावळकर आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकचे रवींद्र ढवळे यांना प्रदान करण्यात आला.

कोरोनामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचाही सन्मान विशेष योगदान पुरस्काराने करण्यात आला.

यावेळी कलावंत प्राजक्त देशमुख, लावण्यवती शिरीन पाटील, शमा देशपांडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार गुरूंच्या नावाने असून, त्याचे खूप महत्व असल्याचे रवींद्र ढवळे यांनी सांगितले. नाटकाने रूप बदलले पण मेले नाही. व्हर्च्युअल जमान्यात नाटक मरणार नाही. नाटकाची मूळ ताकद सत्य असल्याचे लेखक शफाअत खान म्हणाले.

काहीही येऊ द्या नाटकाला गर्दी होणारच

कोरोनाची लाट ओसरल्याने तिसर्‍या लाटेची वाट बघण्यापेक्षा हळूहळू सर्व सुरु केले याचा आनंद आहे. मराठी माणूस नाट्यप्रेमी आहे. मुंबईला असतानासुद्धा कार्यक्रमात बदल करून नाटक बघायला जायचो. मुख्यमंत्रीसुध्दा नाट्यप्रेमी आहेत. टीव्ही, मोबाईलप्रमाणे काहीही येऊ द्या, पण नाट्यगृह उघडल्यानंतर लोक नाटकाला गर्दी करणार म्हणजे करणार. नाटकांमुळे मनस्वी आनंद मिळतो. अभिनेता दिलीप प्रभावळकर यांचा भूमिका असलेला फसवा फसवी’मधील विनोदी अभिनय पाहतो. त्यातून विरंगुळा मिळतो, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

यांचा झाला गौरव

दत्ता भट पुरस्कार (पुरुष अभिनय) : राजेंद्र चव्हाण, शांता जोग स्मृती पुरस्कार (स्त्री अभिनय) : रोहिणी ढवळे, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन) : प्रा. रवींद्र कदम, नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार (लेखन) : विवेक गरुड, वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी) : धनंजय वाबळे, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) : फणिंद्र मंडलिक, रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार (नेपथ्य) : चंद्रकांत जाडकर, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना) : विजय रावळ, रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककलावंत : रमाकांत वाघमारे, शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार : राजन अग्रवाल, विशेष योगदान पुरस्कार : अविराज तायडे, सुभाष दसककर, नितीन पवार, वाघमारे, विशेष कोविड योद्धा पुरस्कार : डॉ. संजय धुर्जड, डॉ. मिलिंद पवार.

First Published on: October 25, 2021 11:24 PM
Exit mobile version