नाशिकमधून लवकरच कृषी कार्गो सेवा

नाशिकमधून लवकरच कृषी कार्गो सेवा

ओझर विमानतळाहून प्रवासी वाहतूकीसह आता लवकरच कृषी कार्गो सेवा सुरू करण्यात येणार आहे. स्पाईसजेटने नाशिकहून पूर्णवेळ कार्गो सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जिल्हयातील कांदा, डाळींब, द्राक्ष तसेच कृषीमालाची निर्यात सुलभ होणार आहे. कार्गो सेवेमुळे ग्रामीण भागातील शेतमाल अपेक्षितस्थळी पोहचणार आहे. स्पाईस जेटच्या माध्यमातून नाशिकहून दिल्ली, गोहाटी, बेंगलोर या शहरांत ही सेवा दिली जाईल असे स्पाईस जेटने स्पष्ट केले आहे.

ओझर विमानतळावरुन सध्या नाशिक ते दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता नाशिकच्या कार्गो सेवेलाही गती मिळणार आहे. आघाडीच्या स्पाईसजेट कंपनीची भारतात सध्या तीन कार्गो विमाने आहेत. यातील एक कार्गो विमान पूर्णवेळ कार्गो सेवा देण्यासाठी नाशिकला आणण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. मनमाड, येवला, निफाड, पिंपळगाव, ओझर येथून माल कंटेनरव्दारे रेल्वे टर्मिनसपर्यंत पाठवावा लागत होता. त्यानंतर तो मुंबई डॉकवर पाठवला जायचा. तेथून अपेक्षित स्थळी माल पोहचायला वेळ लागत होता. मात्र कार्गो सेवेमुळे आता वेळ वाचणार आहे. शिवाय उत्पादनाची गुणवत्ताही टिकून राहणार आहे. माल रेल्वेपर्यंत पोहोचवायला लागणारा ट्रक खर्च, डॉकयार्डपर्यंत पोहोचविण्यासाठी वॅगनचा खर्च, माल उतरविण्यासाठी लागणारी मजुरी, शीप डॉकयार्डवर लागेपर्यंत शीतगृहाचा किंवा गुदामाचा खर्च यामुळे कमी होणार आहे. यापूर्वी नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू झाल्यानंतर कृषीमाल निर्यात करण्यात आला. मात्र स्पाईस जेटच्या माध्यमातून पूर्णवेळ कृषी कार्गो सेवा उपलब्ध होणार असल्याने कृषी माल आयात निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे.

कंपनीने हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) शी पत्रव्यवहारही केला आहे. या विमानाची रात्रीची पार्किंग नाशिक येथेच राहणार आहे. २३ टन क्षमता असलेले हे विमान असून, आठवड्यातील सातही दिवस ते ओझर विमानतळावरुन सेवा देणार आहे.

नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे. येथून फळे, भाजीपाला मोठया प्रमाणावर निर्यात केला जातो ओझर विमानतळाहून कार्गो सेवेसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे येथून कृषी कार्गो सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. स्पाईस जेटने याकरीता तयारी दर्शवली असून लवकरच ही सेवा सुरू होईल त्यामुळे कृषीमाल आयात निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. लवकरच कृषी उडान योजनेंतर्गत सेवा सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
खा. हेमंत गोडसे

First Published on: May 30, 2020 8:39 PM
Exit mobile version