बँक एजंटांच्या दहशतीखाली थकबाकीदार; वसुलीसाठी थेट अपहरणाचेही प्रकार

बँक एजंटांच्या दहशतीखाली थकबाकीदार; वसुलीसाठी थेट अपहरणाचेही प्रकार

नाशिक : शहरात कर्ज वसुलीसाठी बँकांच्या एजंटांकडून थकबाकीदारांना धमकावले जात असून, प्रसंगी मारहाण व अपहरणदेखील केले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. तिबेटीयन मार्केट परिसरातही वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारास मारहाण करणारे तरुण कर्ज वसुली एजंटच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी एजंटांवर कारवाई केली असतानाही संबंधित पत्रकाराला पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी धकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात गुंडगिरी करणार्‍या बँक एजंटांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार, एजंटांची चरित्र पडताळणी केली जाणार आहे. कोणत्या एजंटावर किती गुन्हे आहेत. कधीपासून कर्ज वसुलीचे काम करतो, त्याने कोणाला धमकावले आहे का, याची माहिती शहर पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक शहरातील तिबेटीयन मार्केटजवळील एका हॉटेलमध्ये सोमवारी (दि.२३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकी पार्किंगच्या वादातून थेट तीन जणांनी एका पत्रकारास मारहाण केली. याप्रकरणी संबंधित पत्रकाराने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस तपासात मारहाण करणारे तरुण कर्ज वसुलीसाठी खासगी बँकांनी नेमलेले एजंट असल्याचे समोर आले आहे. या घटनेवरुन बँक एजंटांच्या गुंडागिरीबाबत थकबाकीदार व नागरिक उलट-सुलट चर्चा करत आहेत. कर्ज वसुलीसाठी एजंट थेट थकबाकीदारांना धमकावत आहेत, प्रसंगी मारहाण करत आहेत.

कोणार्कनगरील एकाने लॅपटॉपसाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले. ते वेळेत न फेडल्याने त्यास व त्याच्या पत्नीस बँकेत बोलवत अश्लिल भाषेत बोलत मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. कर्ज वसुलीसाठी एजंट थकबाकीदाराचे अपहरणसुद्धा करत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत. दिवसेंदिवस एजंटांची दहशत वाढत असून, थकबाकीदारांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य म्हणजे, अशा प्रकारांत एजंटांना पोलिसांचा अभय मिळत असल्याने सर्वसामान्य तक्रारदार प्रचंड दहशतीखाली असल्याचे समोर येत आहे. परिणामी, अशा प्रकारांत पोलिसांनी एजंटांवर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी एजंटांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

एजंटांची पार्श्वभूमी तपासा

बँकांमध्ये वसुलीसाठी नेमण्यात येणार्‍या प्रतिनिधींची पार्श्वभूमीवर किंवा चरित्र पडताळणी केली जाते का, असा सवालही यानिमित्ताने आता विचारला जाऊ लागला आहे. बँकांनीच योग्य प्रतिनिधींची नेमणूक केली, तर ग्राहकांना योग्य सेवा मिळून त्यांचे शोषण थांबेल, गुन्हेगारी घटनांनाही आळा घालणे शक्य होइल, अशा प्रतिक्रिया
काही ग्राहकांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केल्या.

First Published on: May 27, 2022 3:08 PM
Exit mobile version