पत्रा फुटल्याने बिबट्या छतावरून घरात कोसळला आणि…

पत्रा फुटल्याने बिबट्या छतावरून घरात कोसळला आणि…

नाशिक : शहर परिसरात बिबट्याच्या दर्शनासह हल्ले सुरूच असून दोन हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच आता मांजरीच्या मागावर असलेला बिबट्या थेट घराच्या छतातून खाली कोसळला. लहवीत येथे ही घटना घडली. मात्र, बिबट्या ज्या घरात कोसळला, त्या घरात कोणीही नसल्याने पुढील अनर्थ टळला.

लहवीत येथील शुभम बाळू गायकवाड यांच्या घरातील कुटुंबीय झोपले असताना रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना मांजरीचा व गुरगुरण्याचा आवाज आला. यावेळी सावजाच्या मागे धावत आलेला बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सर्वाना उठवून एका खोलीत बसले. यावेळी मांजरीच्या मागे धावत असताना बिबट्या थेट घराच्या छतावर गेला. यावेळी बिबट्याने मांजरीमागे पळत असताना उडी मारली असता सीमेंट पत्रा तुटून बिबट्या घरात पडला. बिबट्या पुढील दरवाज्याजवळ लपून बसला. त्यानंतर घरातील लोकांनी प्रसंगावधान राखत मागची खिड़की तोडून बाहेर पड़ले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत वनविभागाने बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दोन दिवसांपूर्वीच म्हसरूळ परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात थाळकर नामक युवक जखमी झाला होता. यानंतर तवली फाटा परिसरातही बिबट्याने एकावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

नाशिकपासून काही अंतरावर असणार्‍या लहवित येथे काळे मळ्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक विजयसिंह पाटील आणि वनमजुर अंबादास जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिस्थितीची पाहणी करीत माहिती घेत मयत बिबट्याचा बछड्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आणि त्यानंतर या मयत बिबट्याच्या बछड्यावर गंगापूर येथील शासकीय रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले होता. त्यामुळे लहवीत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे या घटनांवरून दिसून येते.

First Published on: August 12, 2022 3:23 PM
Exit mobile version