घराबाहेर जाणे टाळा; वाहने होणार तीन महिने जप्त 

घराबाहेर जाणे टाळा; वाहने होणार तीन महिने जप्त 

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. शहरात संचारबंदी व जमावबंदी करण्यात आली असतानाही अनेकजण आदेशाचे उल्लंघन करून वाहनांवरून भटकंती करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांनी अनोखी शक्कल वापरली आहे. विनाकारण शहरात भटकंती करताना वाहनचालक दिसताच त्याचे वाहन तीन महिने जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेता.

करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घराबाहेर जाणे टाळा, सोशल डिस्टन्स ठेवा, अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर जायचे असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. तरीही काहीजण दुचाकी व कारने मित्रांसह रस्त्यांवर येत हुल्लडबाजी करत असून मोबाईलमध्ये फोटो व शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. ही बाब पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास येताच विनाकारण भटकंती करणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करून त्यांची वाहने तीन महिने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवा, असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून विनाकारण भटकंती करणे वाहनचालकांना महागात पडणार आहे.

100 हॉटेल्सला पार्सल सेवेची परवानगी

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेल्सला फक्त पार्सल सेवा सुरु करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांनी संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन जेवण मागवता येणार आहे.

First Published on: March 28, 2020 2:13 PM
Exit mobile version