बळीराजाचे स्वप्न भुईसपाट; शहारालगतचाही शेतकरी अस्मानी संकटात

बळीराजाचे स्वप्न भुईसपाट; शहारालगतचाही शेतकरी अस्मानी संकटात

नाशिक : शहर परिसरात रविवारी रात्री दोन वा.पासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेत पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. विल्होळी, गौळाणे, वाडीवर्‍हे, सारुळ, पिंपळगाव खांब, पाथर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाने गहू, कांदा, द्राक्ष, पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. आधीच कांदा, टोमॅटो, कोथिंबीरसह अन्य मालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना,

काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचा हाता तोंडाशी आलेला घास देखील हिरावून घेतला आहे. पहाटे २ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला होता. त्यांनंतर सोमवारीही पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी कांदा पीकाची शेती उध्वस्त झाली आहे. सध्या द्राक्ष पिक काढणीला असून निर्यातक्षम द्राक्षांची काढणी सुरू आहे मात्र काढणीला आलेली द्राक्षे अवकाळी पावसात खराब होऊन द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठं नुकसान झाले आहे.वादळासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकर्‍यांचे चांगले उत्पन्न हाती येण्याचे स्वप्न भुईसपाट झाले. शेतशिवारात पाणी साचून हरभरा, गहू, मका पिकांची नासाडी झाली. त्यातच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागातर्फे लवकरात लवकर पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. शेतकर्‍यांबरोबरच अवकाळी पावसाचा होळी व धुलीवंदनाच्या सणावरही परिणाम झाला आहे. होळी सणाच्या दिवशी पाऊस पडल्याने नवीन नाशिक परिसरातील त्रिमूर्ती चौक, पवननगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, उत्तम नगर येथे आलेल्या गोवर्‍या विक्रेत्यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. रात्री उशिरा पाऊस आल्याने शनिवार पासून रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून बसलेल्या गोवरी विक्रेत्यांची प्रचंड तारांबळ उडाली. पावसापासून रक्षणाची पुरेशी साधने नसल्याने गोवर्‍या पाण्यात भिजल्या. त्यामुळे विक्रेत्यांच्या अपेक्षांवरही पाणी फिरले तर गोवर्‍या तयार करण्यासाठी मागील चार महिन्यांपासून घेतलेले परिश्रमही पावसाच्या तडाख्यात वाहून गेल्याने गोवरी विक्रेत्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ आली.

First Published on: March 7, 2023 12:39 PM
Exit mobile version