कोट्यवधींची फसवणूक : मुख्य संचालक विष्णू भागवत गजाआड

कोट्यवधींची फसवणूक : मुख्य संचालक विष्णू भागवत गजाआड

गुंतवणुकीवर जादा मोबदल्याचे आमिष दाखवून देशभरातील ठेवीदारांना दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा माऊली, उज्वलम सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडियाचा मुख्य संचालक व मुख्य आरोपी विष्णू रामचंद्र भागवत यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यास जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (दि.१३)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विष्णू भागवत व त्यांच्या साथीदारांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुंतवणूकदाराने फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनास प्रसिसाद देत दुसर्‍या गुंतवणूकदाराने अंबड पोलीस ठाण्यात २ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. या आर्थिक गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या पथकामार्फत सुरु आहे. विष्णू भागवत याने संकल्पसिद्धी स्किम ऑक्टोबर २०१८ मध्ये चालू करुन जानेवारी २०१९ पर्यंत हजारो सभासदांकडून करोडो रुपये गोळा केले. गुंतवणूकदारांना प्रॉडक्ट व परतावा न देता नमुद स्किमचे कामकाज बंद करुन गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे.

पोलिसांनी सात एजंटांना अटक केली आहे. ठेवीदारांच्या रकमेतून भागवत संचालक असलेल्या सोसायटी, कंपनी व एजंटांच्यामार्फत महागड्या गाड्या खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विष्णू भागवत यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबडमधील एका सोसायटीतून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी करत आहेत.

सोसायटी, कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक
भागवत व साथीदारांनी स्थापन केलेल्या उज्वलम अ‍ॅग्रो मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटी, श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑप.सोसायटी, ग्लोबल चेक इन्स प्रा.लि., ग्लोबल चेक, ग्लोबल सिटीझन, नारायणगिरी महाराज फाउंडेशन, संकल्पसिद्धी फर्म व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि., लिनी इंडस्ट्रिज प्रा.लि.या कंपन्या, सोसायटी, फर्मची स्थापना केली. सर्वांनी संगनमताने विविध योजना काढून गुंतवणूकदारांना जादा मोबदल्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केली.

ठेवींमधून महागडी वाहने खरेदी
जादा परतव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक करणार्‍या श्री माऊली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत एजंटांनी ठेवीदारांकडून स्विकारलेल्या ठेवींचा वापर करुन सोसायटी व एजंट यांच्या नावे महागडी वाहने खरेदी केली. पोलीस तपासात कोणतीही पतसंस्था, बँक, को-ऑप सोसायटी १०० टक्के कर्जवाटप करत नसताना माऊली सोसायटीमार्फत मात्र तसे कर्जवाटप झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी सात एजंटांना अटक केली आहे. पोलिसांनी ४ कोटी ८ लाख ६ हजार रुपयांची १२ वाहने जप्त केली आहेत. ४६ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांची ५ कोटी २८ लाख ३४ हजार ३०८ रुपयांची फसवणूक झालेली आहे.

अटक झालेले एजंट असे..
कृष्णा भुजंग वारे (३९, रा.पाथर्डी, जि. अहमदनगर), मयूर सुनील पवार (२७, रा. पवार वस्ती, बाजीरावनगर, ता. येवला), प्रकाश आप्पासाहेब ननावरे (३७, रा. नातेपुते, माळशिरस,सोलापूर), धनंजय भीमराव सावंत (४०, रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सिलापूर), दादा महादेव माने (२६, रा. बारामती), नानासाहेब अशोक पायघन (३५, रा. तळवाडे, ता. हवेली, जि. पुणे), रोहिदास शांताराम हजारे (४८, रा. भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

एजंटांवर देशभर गुन्हे दाखल
एजंटांविरुद्ध आळेफाट पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण, जायखेडा पोलीस ठाणे, नाशिक, भांडुप पोलीस ठाणे, मुंबई, सदर पोलीस ठाणे, जि.चंबा, हिमाचल येथे गुन्हे दाखल झालेले आहेत. मुंबई, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पिंपरी चिंचवड येथील ठेवीदारांकडून कोट्यावधी रुपये जादा परताव्याच्या आमिषाने दाखवून स्वीकारले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

मिळकतींवर होणार कारवाई
विष्णू भागवत व त्यांच्या सोसायटीशी संबंधित एकूण २७ बँक खाती गोठविण्यात आली असून, त्यामध्ये १० लाख रुपये शिल्लक आहेत. भागवतांच्या नावावर असलेल्या मिळकतींबाबत माहिती प्राप्त करुन त्या मिळकती महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यानुसार संलग्न केल्या जात आहे.

First Published on: February 10, 2020 4:20 PM
Exit mobile version