तडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे जप्त

तडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे जप्त

नाशिक शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले असताना विनापरवानगी वास्तव्य करणार्‍या सराईत गुन्हेगारास नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पंढरीनाथ धोत्रे (वय ३६, रा. एरिगेशन कॉलनी, मखमलाबाद शिवार, म्हसरुळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित गणेश धोत्रे तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन घरी आल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळाली.त्यानुसार गुन्हे शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. या ठिकाणी पोलिसांनी त्याला गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एक गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसे बाळगल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी कट्टा व काडतुसे जप्त केली.

First Published on: September 20, 2021 6:34 PM
Exit mobile version