“चार जमल्या आया बाया, मधी बसली ताई!” देवळालीत रंगतेय आजी, माजी आमदारांसह, इच्छुकांची धूळवड

“चार जमल्या आया बाया, मधी बसली ताई!” देवळालीत रंगतेय आजी, माजी आमदारांसह, इच्छुकांची धूळवड

नाशिक : देवळालीत कधी नव्हे इतके इच्छुक विधानसभा निवडणुकीचे रंग घेऊन उधळण करायला तयार झालेत. देवळालीत नाना रंगाच्या समोर कित्येक वर्षे एकाही उमेदवाराचा रंग टिकला नाही अर्थात तग धरला नाही, तेथे गेल्या शिमग्याला भाऊवर मात करत बडी दीदीने इतिहासाचे रंग पुसून अलार्म वाजवला, तेव्हापासूनच चार पाच महिला इच्छुकांनी वेगवेगळे रंग घेऊन जागा दिसेल तिथे उधळण करायला सुरुवात केली. त्यात भाऊंची धाकली बहिणही यात मागे नसल्याने राजकारणात सर्वांचा बाप माणूस असलेल्या नानांच्या लेकीने संपूर्ण मतदारसंघ पायदळी तुडवत भाजप-शिंदे गटाशी केलेल्या जवळीक मुळे बापाच्या डोक्याला ताप झाल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.

देवळालीतील राजकारणाचे रंग उधळायला आजी-माजी आमदारासह चार नव्या दमाच्या महिला इच्छुक सरसावल्याने चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. त्यात विद्यमान आमदार बडी दीदी, भावी आमदार म्हणून दिवाधारी ताई, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्या छोटी दीदी, सुवर्णयुगाचे स्वप्न हाती घेतलेल्या माजी आमदारकन्या आणि नानांची लाडकी कन्या अशा चार इच्छुक महिला उमेदवारांनी एकाच पक्षाच्या रंगाची उधळण करत दावे केले आहेत. राज्यात भाजप-शिंदे गटविरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असल्याने नानांची कन्या थेट शिंदे गटाच्या संपर्कात गेल्याने नानांची पंचाईत झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून देवळाली मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमातून मोठा जनसंपर्क वाढवल्याने ही कन्या चर्चेत आली आहे.

आजी माजी आमदार आपापल्या पक्षाकडून दावेदार आहेत मात्र, भाजप-शिंदे गटाकडून अनेक दावेदार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या निवडणुकीनंतर तीन वर्षांपासून भूमिगत झालेले एका पक्षाचे इच्छुक उमेदवारांनी नातं निसर्गाशी सांगत पुन्हा एकदा सोशल संपर्क सुरू केला आहे. प्रत्येक जण आपलाच रंग भारी अन् दुसर्‍याच्या चुका काढत शिमगा करताना दिसत असला तरी बडी दीदीने मतदारसंघात केलेली भरगच्च विकासकामे व जुने-जटील प्रश्न सोडवल्याने त्यांचे काम कोणालाही नजरेआड करता येणार नाही, हेही तितकेच सत्य आहे. मध्यंतरी विद्यमान व भावी आमदारांमध्ये विकासकामे व प्रशासकीय कामकाजावरुन आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यावेळी आमदारांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत जनतेसमोर आरसा ठेवला.

महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवायची ठरवली तर देवळालीत राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बडी दीदी विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीकडून ठाम दावा असणार असेल आणि भाऊंचा तर विषयच गंभीर आहे. त्यांनी देवळालीच्या बालेकिल्ल्यावरुन स्वबळाचा रंग फासण्याचा थेट इशाराच दिला आहे. या विषयावर महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींच्या वरिष्ठ पातळीवर काय व्हायचे ते होईल, राष्ट्रवादीकडून बडी दीदी, ठाकरे गटाकडून भाऊंना स्वतःच्या पक्षातून सध्यातरी कोणी स्पर्धक नाही. इथपर्यंत ठीक मात्र, भाजप-शिंदे गटाकडून चार-चार महिला उमेदवारांनी उमेदवारीचे आपल्या चेहर्‍यावर रंग फासून घेतल्याने कोणता चेहरा जनतेसमोर द्यावा यावर गेल्या महिन्यात उपराजधानीत चांगलाच खल झाल्याचे समजते.

नुकत्याच देवळालीत राहायला आलेल्या मॅडम लवकरच आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन देवळालीच्या सेवेत हजर होण्याचे संकेत आहेत. गेल्या पाच वर्षात रेशनकार्डपासून इतर अडीअडचणीत मदत, प्रशासकीय कामे मार्गी लावणे यामुळे देवळालीत दांडगा जनसंपर्क आहे. दुसरीकडे भल्याभल्यांना मागे टाकत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्यपदावर छोट्या दीदीने तीनवेळा विराजमान होत पक्षातील दरारा दाखवून दिला आहे. ५० वर्षांपूर्वी देवळालीचे भाग्यविधाते माजी आमदारांच्या कन्येनेसुद्धा देवळालीत सुवर्णयुगाची पहाट होण्यासाठी दौरे सुरू केल्याने देवळालीत चार जमल्या आया बाया, मधी बसली ताई’ या लोकगीताच्या ओळींना साजेसे चित्र पाहायला मिळत असून, थोड्यात दिवसांत आजी, माजी व भावी आमदारांची धूळवड पाहायला मिळणार आहे.

First Published on: March 7, 2023 1:45 PM
Exit mobile version