मुख्यमंत्री साहेब किमान किराणा तरी भरून द्या..

मुख्यमंत्री साहेब किमान किराणा तरी भरून द्या..

नाशिकरोड : कोरोना काळापासून जोखमीचे काम करणार्‍या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कामगारांवर वेतनच मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कर्जबाजारी कंत्राटी कामगारांना जिल्हा प्रशासनाने किमान किराणा तरी भरुन द्यावा, अशी मागणी होत आहे.

दिल्ली येथील सीएससी ई-गव्हर्नस या संस्थेमार्फत सप्टेंबर २०२१ पासून जिल्ह्यातील राजापूर, अंजनेरी, खडकमाळेगाव, सोमठाण, लहवित व उंबरगव्हाण या प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लार्क, लॅब टेक्निशियन, फार्मसिस्ट व शिपाई या पदांवर कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवसापासून या कामगारांना वेतन मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासकीय पातळीवर वेतन देण्यास विलंब होत असेल तर कंत्राटदाराची जबाबदारी असताना शासनाच्या निधीची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, कंत्राटी कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र देवूनही वेतन मिळत नसेल तर किमान किराणा द्या, अशी मागणी केली आहे.

प्रशासकीय पातळीवर आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून गेल्या महिन्यात निधी वर्ग झाल्याचे समजते. असे असतानाही जिल्हा आरोग्य विभागाकडून वेतन वर्ग होण्यास विलंबामागील कारण पुढे आलेले नाही. दरम्यान, थकीत वेतन लवकरच वर्ग होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.

First Published on: September 14, 2022 3:01 PM
Exit mobile version