लाचखोर पोलीस नाईक गजाआड

लाचखोर पोलीस नाईक गजाआड

नाशिक : अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देवून मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकास शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी शहर पोलीस लाईनच्या रुम एकमध्ये लाचलुपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने अटक केले. अरुण हरी लहाने असे अटक करण्यात आलेल्या पोलीस नाईक यांचे नाव आहे.

अरुण लहाने यांची नेमणूक नाशिकरोड पोलीस ठाण्यात आहे. तक्रारदाराविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र नाशिकरोड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. खटल्याच्या सुनावणीचे काम सुरु आहे. ५ फेब्रुवारी रोजी तक्रारदार खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदाराविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढले. ७ मार्च रोजी तक्रारदाराने न्यायालयामार्फत अजामीनपात्र वॉरंट रद्द करुन आणले आहे. वॉरंटची बजावणी करण्याचे काम अरुण हाने यांच्याकडे आले. त्यांनी वॉरंटमध्ये अटक न करुन वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देवून मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी शहर पोलीस लाईनच्या रुम एकमध्ये दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लहाने यास पथकाने अटक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लहानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: March 12, 2021 10:17 PM
Exit mobile version