जिल्हा नियोजन निधी वाटपाचा वाद पुन्हा पेटणार; झेडपी अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार कांदेचा हक्कभंग

जिल्हा नियोजन निधी वाटपाचा वाद पुन्हा पेटणार; झेडपी अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार कांदेचा हक्कभंग

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निधी वाटप करताना गैरकारभार केल्याचा आरोप करत नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी हक्कभंगाची कारवाई करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र विधान सभेच्या प्रधान सचिवांना गुरूवारी (दि.23) दिले.

जिल्हा नियोजन समिती नाशिक अंतर्गत लेखाशिर्ष 3054 व 5054 रस्ते व लघु पाटबंधार्‍यांच्या कामासह इतर योजनांचा निधी वाटपाबाबत गैरप्रकार झाल्याची बाब 30 नोव्हेंबर 2022 व 6 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली होती. निधी वाटप करताना जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियतव्य दायित्वाचा मेळ घालून दायित्वाची कामे पूर्ण निधी देऊन उरलेला शिल्लक निधी दीडपट नियोजन करावे. त्यानंतर हा निधी तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार वाटप करण्यात यावा, असे शासन निर्णयात स्वयंस्पष्टरित्या नमूद असतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी मनमानी पद्धतीने निधी वाटप करत असल्याची बाब जिल्हाधिकार्‍यांना 2 मार्च 2023 च्या पत्रानुसार कळविली होती.

आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी विधीमंडळाच्या सभागृहाद्वारे निधी उपलब्ध केला जातो. असे असतानाही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निधी वाटपात गैरवापर केला ही बाब आमदार व विधीमंडळाचा सभागृहाचा अवमान ठरतो. संसद सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्यांकडून आलेल्या पत्रांना आठवड्याच्या आत पोच देणे व महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे अशा सूचना प्रशासकीय अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या आहेत. असे असतानाही मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दोन्ही पत्रांना अद्याप उत्तर दिलेले नसल्याने त्यांच्यावर हक्क भंगाची कारवाई करावी, अशी मागणी कांदे यांनी केली आहे. यापूर्वीही जिल्हा नियोजन समिती निधी वाटपावरून छगन भुजबळ आणि आमदार कांदे यांच्यात वादंग निर्माण झाले होते.

First Published on: March 24, 2023 2:27 PM
Exit mobile version