२९ क्विंटल कांदा विक्री करणे पडले महागात; परस्पर कांदे खरेदी-विक्री करुन भामटा फरार

२९ क्विंटल कांदा विक्री करणे पडले महागात; परस्पर कांदे खरेदी-विक्री करुन भामटा फरार

नाशिक : कांद्याला समाधानकारक भाव असल्यामुळे उत्पादक शेतकरी चार पैसे मिळण्याच्या मोठ्या आशेने कांदे घेवून मार्केटयार्ड येत आहेत. मात्र, आता कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे चोरट्यांची त्यावर वक्रदृष्टी पडली असल्याचे समोर आली आहे. शेतकर्‍याकडून कांदा खरेदी करत परस्पर विक्री करुन आलेला पैसे घेवून भामटा फरार झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान शरदचंद्र पवार मार्केटयार्डमध्ये घडली. याप्रकरणी देवळा तालुक्यातील मटाणे येथील कांदा उत्पादक शेतकारी नानाजी निंबा साबळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अन्सारी याने नानाजी साबळे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून २९ क्विंटल ४५ किलो कांदा २७ रुपये प्रतिकिलोप्रमाणे खरेदी केला. कांदा विक्रीची पावती आणि चहा पिण्याच्या बहाण्याने संशयित अन्सारी याने साबळे यांना मालेगाव स्टॅण्ड परिसरात आणले. पैसे घेवून येतो, तोपर्यंत येथेच थांबा, असे सांगून अन्सारी फरार झाला. साबळे यांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याच प्रयत्न केला. सुरुवातील त्याने प्रतिसाद दिला. नंतर त्याने प्रतिसाद देणे बंद केले. त्यातून फसवणूक झाल्याचे साबळे यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कासर्ले करत आहेत.

विक्रीच्या ठिकाणी ना कांदा, ना व्यापारी

कांदा खरेदीदार भेटत नसल्याने नानाजी साबळे मार्केटयार्डमध्ये आले. कांद्याची पोती ठेवली त्या ठिकाणी गेले असता त्यांना धक्काच बसला. त्या ठिकाणी कांद्याची पोती नव्हती आणि खरेदीदारही नव्हता. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता भामट्याने परस्पर २९ क्विंटल ४५ किलो कांदा २० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री करून ५८ हजार ५०० रुपये घेतले. पैसे घेवून तो पळून गेल्याचे समजले.

First Published on: November 20, 2020 3:46 PM
Exit mobile version