धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा; २३० झाडे जप्त

धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा; २३० झाडे जप्त

झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी जिल्ह्यातील शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहेत. गांजाची लागवड करताना कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. चांदवड तालुक्यात कांदा, बाजरी, तूर आदी पिके लावली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी (दि.१०) चांदवड तालुक्याती शिरवाडे फाटा येथील तुरीच्या शेतासह इतर ठिकाणी पेट्रोलिंग करत २३० ओली गांजाची झाडे जप्त केली आहेत. यानिमित्त जिल्ह्यात गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली असून गांजाच्या शेतीचा प्रकार या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी रविवारी पिंपळगाव बसवंत, वडनेर भैरव, चांदवड परिसरात अवैध धंद्यांची माहिती मिळवली. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना शिरवाडे फाटा येथे पाहणी केली असता कांनमडाळी शिवारात दत्तू यादव चौधरी (वय ४५, रा.कांनमंडाळे, ता. चांदवड) याने स्वमालकीच्या शेतात गांजा झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खात्री करण्याची शेतामधील तूर पिकाच्या आतमध्ये व इतर ठिकाणी गांजाच्या २३० झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत ९ किलो ३९० ग्रॅम वजनाचा सुमारे ४६ हजार ५०० रुपयांच्या गांजाची ओली झाडे जप्त केली. याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक गुजर, पोलीस हवालदार गोसावी, चव्हाणके, पोलीस शिपाई गोसावी, मर्कड, वडनेर भैरव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या पथकाने केली.

First Published on: October 11, 2020 4:30 PM
Exit mobile version