मी अपक्ष उमेदवारच राहीन; मतदानानंतर सत्यजित तांबे असं का म्हणाले?

मी अपक्ष उमेदवारच राहीन; मतदानानंतर सत्यजित तांबे असं का म्हणाले?

नाशिक – मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहीन, असा ठाम निर्धार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज बोलून दाखवला. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ही निवडणूक एकतर्फी झाली असून विजय निश्चित आहे, फक्त आता मताधिक्य किती मिळेल याची उत्सुकता लागली आहे, अंस ते म्हणाले.

नाशिक पदवीधर मतदारसंघ सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथे घडलेल्या राजकीय नाट्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. उमेदवारी अर्ज भरण्यापासून येथे राजकारण घडलं. काँग्रेसने डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असताना काँग्रेसच्या तिकिटावरून सत्यजित तांबे यांनी अर्ज भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. अखेर पक्षविरोधी कारवायाच ठपका ठेवत काँग्रेसने पिता-पुत्रांना निलंबित केलं. यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान, या मतदारसंघातून भाजपाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे या राजकीय घडामोडींचे सूत्रधार भाजपा असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, शेवटपर्यंत भाजपाने त्यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर केला नाही. तिकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध सत्यजित तांबे असा हा सामना रंगला.

हेही वाचा शुभांगी पाटलांचा खोली क्रमांकच चुकला; ऐनवेळी अधिकार्‍यांची उडाली तारांबळ

निकालानंतर तुम्ही अपक्षच राहणार की कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. तेव्हा मी अपक्षच आहे, अपक्षच राहीन, असं स्पष्टपणे सांगितलं. तसंच, ही निवडणूक एकतर्फी झाली असल्याची प्रतिक्रिया सत्यजित तांबे यांनी दिली. १०० पेक्षा जास्त संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिला असून सर्व स्थानिक पक्षांनीही आपल्यालाच समर्थन दिले असल्याचे ते म्हणाले. माझा विजय निश्चित आहे. फक्त मातधिक्य किती मिळतंय याची उत्सुकता आहे. असं सत्यजित तांबे म्हणाले.

हेही वाचा- सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा, विखे पाटलांकडून निर्णय जाहीर

मी काँग्रेसमधूनच अर्ज भरला होता

मी अपक्ष नव्हे तर काँग्रेसमधूनच अर्ज भरला. मात्र, तीन वाजेपर्यंत मला काँग्रेसचा एबी फॉर्म भरता आला नाही, म्हणून अपक्ष म्हणून अर्ज करावा लागला असं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं. शब्दाने शब्द वाढू नये म्हणून आम्ही याप्रकरणात प्रतिक्रिया दिली नाही. ज्या पक्षात आयुष्यभर राहिलो त्या पक्षाविरोधात जनमाणसांत बोलू नये म्हणून गप्प राहिलो. मात्र, वेळ आल्यावर नक्कीच बोलू, वेळ आल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असंही सत्यजित तांबे म्हणाले.

First Published on: January 30, 2023 2:29 PM
Exit mobile version