IMPACT जीवंत रुग्ण मृत घोषित प्रकरण : उपचारात हलगर्जीपणा, दस्तावेज नोंदणीत गडबड; सखोल चौकशीचे निर्देश

IMPACT जीवंत रुग्ण मृत घोषित प्रकरण : उपचारात हलगर्जीपणा, दस्तावेज नोंदणीत गडबड; सखोल चौकशीचे निर्देश

नाशिक : डॉक्टरांनी मृत घोषित केलेला जळीत रुग्ण एकदा नव्हे तर दोनदा जिवंत असल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात गुरुवारी (दि.२५) सकाळी घडली. या प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी गंभीर दखल घेतली आहे. रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा व दस्तऐवज नोंदणीत गडबडी केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा. आपल्या स्तरावरून चौकशी करून संबंधित विभागाच्या प्रमुखांचा अभिप्राय व चौकशी अहवाल कार्यालयास सादर करावा, असे निर्देश डॉ. अशोक थोरात यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता झा यांना दिले आहेत.

नितीन सुरेश मोरे (४१, रा. मोरे वाडा, अशोकस्तंभ) यांनी पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी (दि. २५) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मोरे याची कोणतीही हालचाल होत नव्हती. वॉर्डमध्ये उपस्थित पदवीत्तर प्रशिक्षणार्थी डॉ. श्वेता नलवाडे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर इसीजी घेतला. इसीजीचा रिपोर्ट फ्लॅट (सरळ रेष) आल्याने त्यांनी नातेवाईकांना मोरे मयत झाल्याचे सांगितले. यानंतर नातलगांनी रुग्णालयाच्या प्रक्रियेनुसार सिव्हिल पोलीस चौकीत रुग्ण मयत झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू झाली.

सकाळी 8 वाजेदरम्यान दुसरे डॉक्टर आले. त्यांनी नेहमीप्रमाणे रुग्णाची तपासणी केली. त्यावेळी मोरे यांच्या पायाची हालचाल दिसली. त्यांनी तात्काळ इसीजी रिपोर्ट घेतला असता त्यांच्या हृदयाचे ठोके आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू केले. मयत मोरे जिवंत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजली. त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांसह वॉर्डातील नर्स, कर्मचार्‍यांना धारेवर धरले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

सकाळी आठ वाजेच्या सुमारास जिंवत झालेले मोरे यांचे हृदय पुन्हा साडेनऊ वाजेच्या सुमारास बंद पडले. वैदयकीय अधिकार्‍यांनी त्यांची नाडी तपासली. त्यानंतर त्यांचे हृदय सुरू करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांचे हृदय सुरू झाले. रुग्णालयातील वैदयकीय अधिकार्‍यांनाही हा अनुभव नवीनच होता. नातलग शांत झाल्यानंतर त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. इसीजी रिपोर्टनुसार रुग्ण मृत असला तरी संथगतीने त्यांचा व्हेंटिलेटरनुसार ऑक्सिजन सुरू होता. सलाईनद्वारे औषध सुरूच होते. कदाचित काही क्षणासाठी हृदय बंद पडले असावे. त्याचवेळी इसीजीचा रिपेार्ट आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत्यूशी झुंज अखेर ठरली अपयशी

 नितीश मोरे यांच्यावर गुरुवारी (दि.२५) उपचार सुरु होते. महिला डॉक्टरने मृत घोषित केल्यानंतर ते जिवंत असल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष होते. मात्र, त्यांचा गुरुवारी (दि.२५) सायंकाळी मृत्यू झाला.

First Published on: May 27, 2023 1:12 PM
Exit mobile version