लासलगावला मुसळधार ; व्यापार्‍यांचा कांदा भिजला, शेतात पाणीच पाणी

लासलगावला मुसळधार ; व्यापार्‍यांचा कांदा भिजला, शेतात पाणीच पाणी

लासलगाव : गेल्या दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगाव परिसरात पावसाची एक तासाहून अधिक वेळ जोरदार बॅटिंग झाली. ढगांच्या आवाजासह, विजेच्या कडकडाटात पावसाने पुन्हा लासलगाव व परिसराला झोडल्याने पुन्हा पाणीच पाणी साचले. या दरम्यान ५० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद लासलगाव बाजार समितीच्या केंद्रावर झाली. जोरदार पावसाने शेतकरी वर्गाचे तसेच व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा मोठ्या प्रमाणात भिजल्याने मोठे नुकसान झालेले आहे.
लासलगावजवळील ब्राह्मणगाव विंचूर येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजता परतीच्या पावसाने ब्राम्हणगाव पूर्व व उत्तर भाग झोडपून काढला. यात केदू न्याहरकर यांचे चार किलोचे लाल कांद्याचे बी व बाळासाहेब गवळी यांचे १४ किलो ऊन्हाळ कांद्याचे बी, सुनील गवळी यांचे सहा किलो उन्हाळ कांद्याचे बी या पावसाने वाहून गेले. इतर शेतकर्‍यांचे सोयाबीन, मका पिकाचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी या परतीच्या पावसामुळे अडचणीत आला आहे. छाटण्या झालेल्या बागेतील घडांची कूज होणे, झाडांच्या मुळ्या चोकप होणे अशा वातावरणामुळे डाउन्या रोगाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने औषध फवारणी खर्चात वाढ होईल, या चितेंने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

मुसळधार पावसामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. तसेच लासलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले, तर लासलगाव बाजार समितीत शेतकर्‍यांकडून लिलावत खरेदी केलेला कांदा हा ओला असल्याने सुकवण्यासाठी उघड्यावर व्यापार्‍याने ठेवला असता अचानक आलेल्या या पावसामुळे संपूर्ण कांदा ओला झाला. यामुळे व्यापार्‍यांचे नुकसान झाले, तर गेल्या आठवड्यात गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसातून वाचलेले शेतीपिके शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वाया जाणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकर्‍यांच्या अनेक शेतांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे तळ्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. संपूर्ण शेतीपिके खराब होण्याच्या मार्गावर असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा मोठा प्रश्न बळीराजा समोर उभा राहिला आहे.

First Published on: October 9, 2021 10:00 AM
Exit mobile version