खासगी क्लासेसचे 1500 कोटींचे नुकसान

खासगी क्लासेसचे 1500 कोटींचे नुकसान

नाशिक: मार्चपासून शाळा, महाविद्यालयांसह खासगी क्लासेसही ‘लॉकडाऊन’ झाल्यामुळे जिल्ह्यातील अडीच हजार क्लासेस चालकांचे दीड हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतातरी छोट्या क्लासेस चालकांना शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी क्लासेस चालक संघटनांकडून केली जात आहे. नाशिक महानगरात सुमारे 1200 खासगी क्लासेस आहेत. यातील 350 क्लासेस हे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनी संलग्न आहेत. या संघटनेनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देवून छोट्या क्लासेस चालकांना आता परवानगी द्या, अशी मागणी केली. परंतु, राज्य शासनाने अजूनही त्यांना परवानगी दिलेली नाही.

शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नियमित वेतन मिळते. परंतु, क्लासेस संचालक शिक्षक व येथे शिकवणारे इतर विषय शिक्षक यांचेे आर्थिकदृष्ठ्या प्रचंड हाल होत आहेत. गेल्या वर्षी शेवटी न मिळालेली फी, गेल्या चार महिन्यांपासून चालू असलेले भाडे, कर्जाचे हफ्ते, वीज पाणी, देखभाल-दुरुस्ती, घरपट्टी यांचा खर्च याशिवाय कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला घरखर्च आणि त्यात कोणताही आर्थिक स्रोत नसल्याने घरगुती, छोटे व मध्यम क्लासेस चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. काहींनी ऑनलाईन क्लासेस सुरु केले; परंतु, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पालक फी भरण्यास उत्सुकही नाही किंवा टाळाटाळ करत आहेत. यासर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणात क्लासेस संचालक अडचणीत सापडले आहेत. बेरोजगारीमुळे अनेक सुशिक्षित तरुण- तरुणींनी नोकरी व्यवसाय नसलेल्या शिक्षकांनी क्लासेस सुरु केले. अनेकांच्या क्लासमध्ये विद्यार्थी संख्या बोटावर मोजण्याइतकी असते. त्यावर ते उदरनिर्वाह करतात, परंतू सरकारमात्र शाळा, कॉलेजला व क्लासेसला एकाच तराजूत मोजत आहे. इतर सर्व व्यवसायांना शासनाने परवानगी दिली आहे. कमी संख्येने विद्यार्थी घेऊन सोशल डिस्टंन्सिंग पाळून मास्क व सॅनिटायझर वापरुन 5 ते 10 विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यास शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा या व्यावसायिकांना दरमहा 10 हजार मदत करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

दहावी, बारावीचे ऑनलाईन क्लासेस साधारणत: मे महिन्यात सुरु झाले.जिल्ह्यातील अडीच हजार क्लासेसपैकी बर्‍याच जणांनी ऑनलाईन क्लासेस सुरु केले. मात्र शाळा कॉलेजप्रमाणेच त्याला फारसा चांगला प्रतिसाद नाही. जवळपास 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांपाशी हे ऑनलाईन क्लासेस पोहोचलेले नाही. त्यामुळे पालक फी भरत नाहीत. अभ्यासक्रमाबाबत उत्सुकता असल्याने कोणता भाग शिकवायचा व कोणता नाही याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने कमी विद्यार्थी घेऊन, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून छोट्या व घरगुती क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी.
– जयंत मुळे, अध्यक्ष, जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना

First Published on: July 12, 2020 8:59 PM
Exit mobile version