खासगी डॉक्टरांची ‘लम्पी’लूट; लसीकरणासाठी पैशाची मागणी

खासगी डॉक्टरांची ‘लम्पी’लूट; लसीकरणासाठी पैशाची मागणी

नाशिक : लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांना मोफत लस देण्याचे आदेश असताना खासगी पशुसंवर्धन डॉक्टर शेतकरी व पशुपालकांकडून पैसे घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पैसे घेणार्‍या डॉक्टरांची चौकशी सुरु झाली असून,त्यात तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी घेतली आहे.

जिल्ह्यात 8 लाख 95 हजार गायवर्गातील जनावरे आहेत. त्यातील सव्वादोन लाख गायी व बैलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यासाठी एकूण सहा लसी उपलब्ध झाल्यामुळे शासकीय पशुसंवर्धन डॉक्टरांमार्फत लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या आणि लसीकरणाचे प्रमाण विचारात घेता लवकर लसीकरण पूर्ण करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाते. त्यांना एका जनावराच्या लसीकरणामागे तीन रुपये दिले जाणार आहेत. तरिही येवला तालुक्यातील खासगी डॉक्टर शेतकर्‍यांकडून 20 ते 30 रुपये प्रती जनावर याप्रमाणे पैसे घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून, दोषींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे यांनी घेतला आहे. लम्पी लसीकरण मोफत आहे. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर पैसे देऊ नये. पैसे मागितल्यास थेट जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी अथवा विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन डॉ. गर्जे यांनी केले आहे.

लसीकरण पूर्णत: मोफत

मोफत लसीकरणाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर वेग वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 25 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणासाठी पशुसवंर्धन विभागास सद्यपरिस्थितीत 6 लाख 25 हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. 244 पशु वैद्यकीय दावखान्यांमध्ये लसीकरण सुरू आहे. 100 टक्के लसीकरण करण्याचे नियोजन विभागाने केल्याची माहिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

First Published on: September 28, 2022 2:23 PM
Exit mobile version