मनमाड : आपुर्‍या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची परवड; एसटी थांबत नसल्याने जीवघेणा प्रवास

मनमाड : आपुर्‍या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची परवड; एसटी थांबत नसल्याने जीवघेणा प्रवास

मनमाड : एकीकडे एसटीची अपुरी संख्या.. ज्या आहेत त्या वेळेवर धावत नाही.. एसटी आलीच तर ती थांबत नाही… थांबलीचं तर ती अगोदरचं प्रवाशांनी फुल भरलेली असते त्यामुळे जागा नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांना वाहक एसटीत चढू देत नाही. वेळेवर शाळेत गेलो नाही तर शिक्षक रागविण्याची भीती त्यामुळे हात देऊन खासगी वाहन थंबविण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र वाहने थांबत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली, तेल टँकरमधून प्रवास करून करण्याची वेळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यावर आल्याचे विदारक चित्र रोज दिसत आहे.

मनमाड- नांदगाव मार्गावर मासिक पास असताना देखील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मिळेल त्या खासगी वाहनाने शाळेत जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे.
या बाबत अधिक वृत्त असे कि वाड्या, वस्त्या आणि छोट्या गावामध्ये इ. 5 वी पर्यंत शाळा असल्यामुळे त्यानंतरच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब, आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना नांदगाव, मनमाड शहरात जावे लागते. त्यांच्यासाठी सर्वात स्वस्त साधन एसटी आहे. मात्र सध्या एसटीचीं संख्या कमी असून ज्या आहेत त्या शाळेच्या वेळेवर धावत नाही. एसटी आलीच तर ती थांबवत नाही आणि थांबलीच तर ती अगोदरच प्रवाशांनी पूर्ण भरलेली असते. त्यामुळे जागा नसल्याचे सांगत वाहक विद्यार्थ्यांना एसटीत चढू देत नाही. अशा एक ना अनेक समस्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनी एसटीचा मासिक पास देखील काढलेला आहे. मात्र तरी देखील त्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मिळेल त्या खासगी वाहनाने जावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव-बेटी पढाओ असा एकीकडे नारा देत असतांना शिक्षणाची आस धरलेल्या विद्यार्थीनींची परवड करण्याचे काम एसटीच्या सेवकांतर्फे होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. मनमाड ते नांदगाव यादरम्यान बुरुकुलवाडी, पानेवाडी, जोंधळवाडी, हिसवळ, शास्त्रीनगर, हिरेनगर, लक्ष्मीनगर, घोटाणे खुर्द आदी अनेक गावांसह वाड्यावस्त्यांवरून एक ते दोन कि.मी. पायपीट करत रस्त्यावर येवून विद्यार्थी मनमाड व नांदगावला शालेय शिक्षण घेण्यासाठी जातात मात्र शाळेत जाण्यासाठी त्यांना द्रावडी प्राणायाम करावा लागत आहे. एसटी बसच्या चालक वाहकांच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांना पास असून बसमधून प्रवास करता येत नाही. एकतर बस थांबत नाही थांबल्यास आतमध्ये जागा नाही असे सांगून बस पुढे दामटली जाते. यामुळे तासनतस खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागते व मिळेल त्या वाहनातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यातच मुलींची संख्या मोठी असून, या विद्यार्थीनींना देखील खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. एखाद्या वेळेस अनोळखी वाहनातून प्रवास केल्यास अप्रिय प्रकारास सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येवू शकते. किमान याचे भान तरी ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची बस अभावी होत असलेली परवड लक्षात घेता मनमाड व नांदगाव आगारातून विद्यार्थ्यांसाठी वेळेवर आणि जादा बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे

First Published on: January 21, 2023 4:56 PM
Exit mobile version