मोबाईलचा अतिवापर मुलांच्या जीवावर

मोबाईलचा अतिवापर मुलांच्या जीवावर

chine mobile app

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद व शिक्षण चालू होते. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी कायम राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर सुरू झाले. प्रत्यक्षात शिक्षणापलिकडे झालेला मोबाईलचा अतिवापर मुलांच्या जीवावर उठला असल्याचे समोर आले आहे. त्यातच इंटरनेटचा मनमानी वापर सुरू झाल्याने सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांसह तरुणाई आभासी जगातील गोष्टी खर्‍या समजू लागली आहे. परिणामी, मुले हिंसक, चिडचिडे होऊ लागली आहेत, तर काही मुलांमध्ये भितीची लक्षणे दिसू लागली आहेत. झटपट श्रीमंतीसाठी ऑनलाईन गेम, रोलेट, सट्टयाच्या नावाखाली अनेकांनी लाखो रुपये गमावल्याचे समोर आले आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हारवल्याने मुलांसह तरुणाईवर शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जात आहेत. मोबाईलचा अतिवापराने मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासावरही त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. अल्पवयीन वयात गुन्हेगारीबद्दल आकर्षण वाटत आहे. तसेच, पॉर्न, वेबसिरीज व्हिडिओद्वारे मुलांच्या मनावर दुष्परिणाम होत आहे.ऑनलाईन जुगार, रोलेटमध्ये ऑनलाईन बँकिंगचा वापर केला जातो. मोबाईल क्रमांक वडीलांच्या बँक खात्याशी संलग्न असल्याने त्यांना न कळता हे पैसे जुगारासाठी वापरले जात असल्याचे अलिकडेच घडलेल्या नाशिकरोड येथील घटनेवरुन दिसून आले आहे.

ऑनलाईन सट्ट्यासाठी आई-वडिलांकडून घेतले लाखो रुपये

शहरातील एका तरुणाला प्रतिमहिना ५० हजार रुपये वेतन आहे. तो मोबाईल इंटरनेटवर सतत सर्फिंग करायचा. त्यातून त्याला ऑनलाईन सट्टयाची जाहिरात दिसली. झटपट श्रीमंत होण्यासाठी सट्टा खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. अधिक पैशांच्या लालसेतून तो पगाराची सर्व रक्कम त्यात गुंतवू लागला. मात्र, हाती काहीच आले नाही. त्यातून वेळीच सावरण्याऐवजी सट्ट्यासाठी त्याने आईवडिलांकडून तीन लाख रुपये घेतले. तेही तो सट्ट्यात हरला. त्यानंतर मात्र ऑनलाईन सट्टा खेळता येत नसल्याने त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. सध्या मानसोपचार तज्ज्ञाकडे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

इंटरनेट अतिवापराचे परिणाम

इंटरनेट वापर नेमका कशासाठी करायचा, हे ठरवूनच मोबाईल व इंटरनेटचा वापर केला पाहिजे. इंटरनेटवरील मार्केटिंग, अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये. सोशल मीडियावर वैयक्तीक माहिती टाकताना काळजी घेतली पाहिजे. पालकांनीही मुलांना वेळ देत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.

– डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचार तज्ज्ञ

First Published on: February 9, 2021 12:01 AM
Exit mobile version