नाशिक जिल्हयात अवकाळी पावसामुळे ६३६ कोटींचे नुकसान

नाशिक जिल्हयात अवकाळी पावसामुळे ६३६ कोटींचे नुकसान

नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने साडेतीन लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, प्रत्यक्षात नुकसानीची तीव्रता दुपटीने वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्हयात साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून कृषी विभागाने केलेल्या मुल्यांकनानुसार ६३६ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून आता मदतीकडे शेतकर्‍यांचे डोळे लागून आहे.

७ लाख ७६ हजार शेतकरी बाधित

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळीने खरिप हंगामातील उभ्या पिकांचे आणि काढून ठेवलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, मका, बाजरी आणि सोयाबीन पिकांना याचा मोठा फटका बसल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. तसेच सोयाबीन पीकाला जागेवरच मोड फुटत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता खचला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे सुरू केले आहेत. प्रशासनाने सुटीच्या दिवशीही बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले असून अंतिम अहवालानुसार १९५९ गावांतील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण करण्यात आल्यानंतर कृषी विभागाने शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ३३ टक्क्यांवरील पिकांच्या नुकसानीचे मुल्यांकन केले आहे. त्यानुसार ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार शासनाकडे निधीची मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकांचे झाले असून ५५ हजार ९६५ हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५४ हजार हेक्टरवरील कांदा, ४० हजार हेक्टरवरील मका तर ६० हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. सध्या राज्यात निर्माण झालेली राजकिय अस्थिरता, सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने नविन सरकार स्थापन येईपर्यंत शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रतिक्षाच करावी लागणार, असे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांमध्ये मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पिकाचा प्रकार          बाधित शेतकरी           बाधित क्षेत्र अ                 पेक्षित निधी

जिरायत                        ५५३४८४                          ४० हजार ९२७                 २७८ कोटी ३० लाख
बागायत                        २३००७७                         १ लाख ५६ हजार                 २११ कोटी ७ लाख
वार्षिक फळपिक              १०४३६५ ४१८.१६                     ५६ कोटी                            ४५ लाख
बहुवार्षिक फळपिक          ८१ हजार २७०                      १४६ कोटी                            २८ लाख

पिक निहाय नुकसान हेक्टरमध्ये

बाजरी – ७२९३३
भात – ५२२५८
मका – १,६५,०४७
कापुस – २१०७९
सोयाबीन – ६०१०३
कांदा – ५४४०८
भाजीपाला – ५३४००
द्राक्षे – ५५९६५

जिल्हयातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्यात आले आहे. या अहवालानूसार ६ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले असून नुकसानीचे क्षेत्र वाढलेले आहे. पंचनाम्याचा अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून उन्हाळी कांद्याच्या रोपांचेही नुकसान झाल्याने आगामी काळात कांदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी


हेही वाचा – कांदा भाववाढीचे नेमके कारण काय?


 

First Published on: November 14, 2019 4:16 PM
Exit mobile version