उद्यापासून लालपरी धावणार

उद्यापासून लालपरी धावणार

नाशिक : दोन महिन्यांपासून लॉकडाऊन झालेली लालपरी शुक्रवार (दि.22) पासून पुन्हा रस्त्यावर धावणार आहे. एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने नाशिक व मालेगाव महापालिकांचे क्षेत्र सोडून उर्वरीत भागातील गाड्यांचे नियोजन केले आहे. सकाळ, दुपार व संध्याकाळी अशा तीन टप्प्यात एकूण 78 गाड्या सोडण्यात येणार असून, आवश्यकता वाटेल त्याठिकाणी गाड्यांची संख्याही वाढवली जाणार असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी म्हटले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी पहिला लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून लालपरीची चाके थांबली आहेत. मध्यंतरी कोटा (राजस्थान) शहरातून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात एसटीने महत्वाची भूमिका निभावली. तेव्हापासून लालपरीचे चालक, वाहक घरीच आहेत. काही चालकांनी तर अत्यावश्यक सेवेच्या गाड्या चालवण्याचे कामही सुरु केले आहे. अखेर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या आदेशांच्या आधारे शुक्रवारपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळवण, लासलगाव, येवला, सटाणा, पेठ, पिंपळगाव, नांदगाव, मनमाड, सिन्नर, इगतपुरी या डेपोंतून गाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांना सामाजिक अंतर राखून प्रवास करावा लागेल. प्रत्येक गाडीत फक्त 22 प्रवाशी बसू शकणार आहेत. तसेच बसेसचे निर्जंतुकिकरण केले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

डेपोनिहाय बसेस

First Published on: May 21, 2020 6:26 PM
Exit mobile version