पहिल्याच दिवशी ६४ प्रवाशांनी केला नाशिक-हैदराबाद प्रवास

पहिल्याच दिवशी ६४ प्रवाशांनी केला नाशिक-हैदराबाद प्रवास

नाशिक : नाशिकधून हवाई सेवेचा विस्तार होत असून, शुक्रवार(दि.२२)पासून स्पाइसजेटने हैद्राबाद-नाशिक-हैद्राबाद ही नवी विमानसेवा सुरू केली. सेवेच्या पहिल्याच दिवशी 64 प्रवाशांनी प्रवास केला. यावेळी 28 प्रवासी हैदराबादहून नाशिकला आले तर, 36 प्रवाशी नाशिकहून हैदराबादला गेले.

नाशिक विमानतळाहून सध्या अहमदाबाद, पुणे, बेळगाव, दिल्ली या शहरांकरीता विमानसेवा सुरू असून शुक्रवारपासून स्पाइसजेटकडून नाशिक हैदराबाद ही सेवा सुरू करण्यात आली. सोमवार ते शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस ही सेवा अखंडीतपणे सुरू रहाणार आहे. 90 आसनी विमानाव्दारे ही सेवा दिली जात आहे.या सेवेमुळे नाशिक व हैद्राबाद या दोन्ही शहरातील व्यवसाय, पर्यटन तसेच आयटी कंपन्यांतील देवाण-घेवाण वाढीसाठी यामुळे हातभार लागणार आहे. दिल्लीकरीता 4 ऑगस्टपासून सेवा सुरू होणार आहे. हैद्राबाद सेवेचे वैशिष्टय म्हणजे, ही सेवा पुढे तिरूपती आणि पुद्दुचेरी यांनाही कनेक्ट करण्यात आली आहे. यामुळे अवघ्या सहा तासात तिरूपतीला पोहचणे नाशिककरांना शक्य झाले आहे. मुंबईला जाऊन तिरूपती फ्लाइट घेण्याची गरज आता उरणार नाही विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या उडाण योजनेत या सेवेचा समावेश असल्याने काही आसने ही सवलतीच्या प्रवास भाड्यात मिळवणे प्रवाशांना शक्य आहे.

असे आहे तिकीट दर

नाशिक-हैदराबादसाठी ३७०० रुपये, तर नाशिक-दिल्लीसाठी ६ हजार १०९ रुपये साधारणत: प्रवास भाडे असल्याने प्रवाशांना फायदेशीर ठरत असल्याचे आयमा एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनिष रावल यांनी सांगितले.

तिरूपतीसाठी असे आहे वेळापत्रक

नाशिक-हैदराबादला तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. हैद्राबादहून सकाळी ६.२० वाजता नाशिकसाठी टेकअप आणि नाशिकमध्ये ७.५० वाजता लॅण्डींग तर नाशिकहून सकाळी ८.१० वाजता उड्डाण घेणारे विमान ९.४० वाजता हैदराबादला पोहोचते. तेथून दुपारी १२.५५ वाजता तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाईट असून, ती दुपारी २.०५ वाजता तेथे पोहोचेल. तर दुपारी ११.५० वाजता पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाईट असून, ती दुपारी १.३० वाजता तेथे पोहोचेल.

First Published on: July 23, 2022 2:44 PM
Exit mobile version