तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली नापास

तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण प्रणाली नापास

नाशिक: कोरोनामुळे ’वर्क फ्रॉम होम’ ची पध्दत रूढ झाली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करावा लागत आहे. मात्र याबाबत पुरेशी सुविधा तसेच मार्गदर्शन नसल्याने ऑनलाईन शिक्षण प्रणाली अपयशी ठरल्याचा निष्कर्ष भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. सुमारे ७० टक्के विद्यार्थी या प्रणालीबाबत सहमत नसल्याचे यातून दिसून आले आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा शाळा, महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. शिक्षण सुरू झाले असले तरी, शैक्षणिक वर्ष अद्याप सुरू झालेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये कधी सुरू याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. कोरोनाच्या भीतीमुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होउ नये याकरीता १ जूलैपासून टप्प्याटप्प्याने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याकरीता प्राथमिक, माध्यमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्यात येउन ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहे. याकरीता पालकांना सुचनाही देण्यात आल्या आहेत. अनेक शाळांमधून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन अभ्यास करतांना विद्यार्थी इ-बुक, विविध लर्निंग अ‍ॅप्सचा वापर करू लागले आहेत. तर शाळांकडून अभ्यासाशी संबंधित व्हिडीओं देखील विद्यार्थ्यांना पाठविण्यात येत आहे . अभ्यास करण्यासाठी व्हिडीओ कॉल, पीडीएफ स्वरूपातील पुस्तकं यांचा विद्यार्थी पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. मात्र तांत्रिक सुविधांची असलेली कमतरता, इलेक्ट्रानिक उपकरणांची कमतरता आणि योग्य मार्गदर्शन नसल्याने ही पध्दत अपयशी ठरल्याचे यातून दिसून येते. आयआयटीच्या ४० संशोधकांच्या ऑनलाईन शिक्षणावरील हा अहवाल ‘आर्काईव्ह’ या प्रिप्रींट जर्नलमध्ये प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे ही पध्दत अवलंबवतांना आवश्यक तेवढेच ऑनलाईन शिकवून उर्वरित साहीत्य उपलब्ध करून द्यावे लागेल. शिकवतांना पीपीटी, डेमो, व्हीडीओ दाखवावे लागतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद वाढवावा लागेल असे निष्कर्षही नोंदविण्यात आले आहेत.

First Published on: July 12, 2020 9:05 PM
Exit mobile version