एसटी बसच्या धडकेत पादचारी जागीच ठार

एसटी बसच्या धडकेत पादचारी जागीच ठार

नाशिकहून साक्रीकडे जाणार्‍या भरधाव एसटीने रस्ता ओलांडणार्‍या पादचारी तरुणाला जोरदार धडक देत चिरडत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना देवळा-नाशिक रस्त्यावरील गुंजाळनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बोगद्याजवळ सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल एकनाथ पानपाटील (वय ३२, रा. गुंजाळनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुंजाळनगर येथील अनिल पानपाटील हा तरुण गुंजाळनगरजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बोगद्याजवळ पायी रस्ता ओलांडत असताना समोरून येणारी नाशिकहून साक्रीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या साक्री आगाराच्या एसटी बसने (एमएच १३-सीयू ७३०६) जोरदार धडक देत १० ते १५ फुटापर्यंत फरपटत नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेह रस्त्यावर अक्षरशः छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. याबाबत देवळा पोलिसांत मृत तरुणाचे मामा रमेश सुखदेव साळवे यांनी फिर्याद दिली असून मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. लहुजी शक्ती सेनेचे दीपक पानपाटील यांचे ते लहान बंधू होते. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास गवळी, शरीफ शेख, अरुण आहिरे करत आहेत.

First Published on: September 28, 2021 7:15 AM
Exit mobile version