कसारा घाटात पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट

कसारा घाटात पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट

मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी (दि.६) रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांच्या रात्र गस्त घालत असलेल्या महामार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू व फायटर जप्त केले आहे. नांदगाव सदो (ता. इगतपुरी, जि.नाशिक) येथील नागेश हरिश्चंद्र भंडारी (वय १९), सूरज गोपीचंद भंडारी (वय १९) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

कसारा घाटात रविवारी (दि.६) रात्री घोटी केंद्राचे महामार्ग पोलीस सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एम. के. पवार, पोलीस नाईक नंदन, पोलीस नाईक जाधव हे शासकीय वाहनातून गस्त घालत होते. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर प्रवीण कंपनीसमोर पोलिसांना दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी वाहन थांबवून दोघांची चौकशी केली असता सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्यावर धारदार चाकू व फायटर आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत घोटी पोलीस चौकीत आणले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता दोघजण जीवघेणा हल्ला घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलीस तपासात दोघांवर दरोड्यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना पुढील कारवाईसाठी इगतपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दले आहे.

First Published on: September 6, 2021 1:47 PM
Exit mobile version