नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर ‘चक्क’ क्रिकेट सट्ट्याचे प्रमोशन

नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर ‘चक्क’ क्रिकेट सट्ट्याचे प्रमोशन

नाशिक : पाणीपुरवठा, पथदीप, आरोग्य, रस्ते, उद्यान अशा पायाभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेने आता वेबसाईटद्वारे क्रिकेट सट्ट्याचे प्रमोशन सुरू केले की काय, अशी शंका पालिकेेची वेबसाईट पाहून व्यक्त होत आहे. या वेबसाईटवरील इमारत प्लॅन पर्यायावर क्लिक करताच दुसरी वेबसाईट सुरू होऊन त्यात चक्क क्रिकेट सट्ट्यासंदर्भात प्रबोधनपर सविस्तर माहिती वाचायला मिळत आहे.

महानगरपालिकेच्या https://nmc.gov.in/ या वेबसाईटवर ई-सेवेंतर्गत मालमत्ता कर, पाणी कर, नागरी सेवा, तक्रार, उत्सव मंडप परवानगी, आमचे कार्य जाणून घ्या, ई-निविदा, कालिदास कलामंदिर थिएटर बुकिंग, इमारत प्लॅन आणि एनएमसी जीआय एस या १० सेवा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेवेच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या-त्या विषयाशी किंवा विभागाशी निगडीत माहितीचे पेज उघडते. मात्र, इमारत प्लॅनच्या टॅबवर क्लिब करताच वेबसाईट रिडायरेक्ट होऊन थेट सट्ट्याची माहिती असलेले nmcobpas.in/ हे पेज ओपन होते. त्यामुळे नाशिककरांचा भ्रमनिरास होऊन पालिकेविषयी संभ्रम निर्माण होतो.

हा तर यंत्रणेचा निष्काळजीपणा

महापालिकेच्या वेबसाईटचा सर्व्हर हा सरकारच्या अखत्यारितील सेवेचा भाग आहे. मात्र, नाशिक महापालिकेने त्यात अन्य माहिती टाकण्यासाठी खासगी कंपनीकडून स्वतंत्र डोमेन वर्षभरासाठी घेतलेला होता. प्रचलित पद्धतीनुसार एक ते तीन वर्षांसाठी ठराविक रक्कम भरल्यानंतर तेवढ्या कालावधीसाठी हा डोमेन (वेब अ‍ॅड्रेस) वापरता येतो. महापालिकेने हा डोमेन बिल्डिंग प्लॅन पर्यायात टाकलेला आहे. त्याचा वापरच करायचा नव्हता तर तो घेतलाच कशाला, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच, डोमेनचा कालावधी संपुनही यंत्रणेला त्याची माहिती नसणे, यातून पालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

नगररचना विभाग ‘माये’त गुंग?

महापालिकेतील सर्वाधिक मलाईदार विभाग म्हणून ओळख असलेल्या नगररचना विभागातील दुढ्ढाचार्‍यांना आपल्या संकेतस्थळावर नक्की काय टाकले जात आहे हे कळू नये हे विशेष. वास्तविक, नगररचना विभागाच्या कामात पारदर्शकता यावी आणि हे काम सहजपणे पुढे जावे यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर इमारत प्लॅनचा पर्याय देण्यात आला आहे, जेणेकरुन लोकांना हा प्लॅन सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. परंतु अशाने ‘दुकानदारी’च बंद होण्याची शक्यता असल्याने या विभागातील मुखंडांनी ऑनलाईन व्यवस्थेचा जाणीवपूर्वक बोजवारा उडवल्याचे दिसून येते. विशेषत: इमारत प्लॅन रखडवून ठेवण्यात संबंधित पटाईत झालेले दिसतात. सर्वच व्यवहार ऑफलाईन करुन त्या माध्यमातून इच्छित साध्य करण्यात ही मंडळी इतकी गुंग झाली आहे की, त्यांना आपल्या संकेतस्थळावर चक्क क्रिकेटच्या बेटींगची माहिती टाकण्यात आल्याची साधी कल्पनाही नव्हती. कदाचित या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी इतके ‘माया’ळू झाले आहेत की, ही ‘माया’ डोईजड झाल्याने ती वाटण्यासाठी बेटिंगचा सहारा घेतला की काय, अशी शंका संकेतस्थळ बघून नाशिककरांच्या मनात उत्पन्न झाली नाही तर नवल !

संकेतस्थळावर ठराविक विषयाची माहिती देण्यासाठी बर्‍याचदा विशिष्ट डोमेनचा वापर केला जातो. nmcobpas.in/ हे डोमेन ऑटोकॅडसाठी वर्षभरासाठी विकत घेतलेेले होते. त्याची मुदत संपल्याने दुसर्‍या कुणी हा डोमेन विकत घेतलेला दिसतो. त्यातून हा प्रकार घडला आहे. : विजयकुमार मुंडे, उपायुक्त, महापालिका

First Published on: January 28, 2023 12:37 PM
Exit mobile version