राष्ट्रवादी आमदाराचा जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या

राष्ट्रवादी आमदाराचा जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या

नाशिक : जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील सिमेंट प्लग बंधार्‍यांच्या कामाची फाईल ठेकेदाराने परस्पर गहाळ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झरवाळ यांनी रात्रभर ठिय्या मांडला. रात्रभर निर्धास्त झोपलेल्या प्रशासनाला सकाळी जाग आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र, बांधकाम विभागातील अधिकारी ठेकेदारांच्या मर्जीनेच कामकाज चालवत असल्याचे आमदार झिरवाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या निदर्शनास आणले. आमदारांच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रत्यत्तर देताना प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर 20 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर आमदार झिरवाळ यांना कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले.

हे देखील वाचा – फाईल गहाळ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या आमदारांचा जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या

दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी येथील सिमेंट प्लग बंधार्‍याच्या फाईल लघु पाटबंधारे पश्चिम विभागाकडून वित्त विभागाकडे दाखल झाल्या. या फाईल्स थेट गहाळ झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.17) रात्री 9 वाजेपासून आमदार झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या मांडला. रात्री उशीरा पदाधिकारी, सदस्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार झिरवाळांसह माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राजाभाऊ ढगे यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. आमदारांच्या ठिय्या आंदोलनानाने बुधवारी (दि.18) सकाळपासून प्रशासनाची धावपळ झाली. भुवनेश्वरी एस यांच्या दालनात बैठकीसाठी आंदोलनकर्त्यांना घेऊन गेले. आमदार झिरवाळ यांसह पदाधिकारी यांनी बांधकाम विभागातील सुरू असलेला गलथान कारभाराच्या तक्रारी मांडल्या. ई -निविदा कक्षात रात्री काम केले जाते, कार्यकारी अभियंता ठेकेदारांना घेऊन कामांच्या निविदा अंतिम करतात, ठेकेदारांकडूनच फाईलींचा प्रवास होतो, ठराविक ठेकेदारांनाच कामाचे वाटप केले जाते, 10 वर्षापासून सहायक लेखाधिकारी ज्ञानेश्वर लाड कर्मचारी एकाच टेबलावर ठाण मांडून असून, त्याचे ठेकेदारांशी असलेले लागेबांधे आदींबाबतचे आरोप झिरवाळ यांनी यावेळी केले.

यावर कार्यकारी अभियंता दत्तात्रय गांगुर्डे यांना विचारणा केली असता, एकाही तक्रारींचे त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे उपस्थित पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यानंतर माजी आमदार जयवंत जाधव यांनी आमदार झिरवाळ यांच्या तक्रारींवर लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. यावर भुवनेश्वर एस यांनी आमदार झिरवाळ यांनी केलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून त्यांचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश बजाविले. तसेच फाईल गहाळप्रकरणी दोषी असलेल्या सर्व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आमदार झिरवाळ यांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवाजी सहाणे, सभापती यतिंद्र पगार, सभापती अर्पणा खोसकर, हिरामण खोसकर, विनायक माळेकर यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार

गेल्या दोन दिवसांपासून सिमेंट प्लग बंधार्‍याच्या कामांची फाईल शोधण्याची विनंती जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली अन् काम न करताच निघून गेले. अधिकारी एखाद्या ठेकेदाराच्या मर्जीने काम करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे म्हणून रात्रभर ठिय्या मांडला. याविषयी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. – नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी

First Published on: September 18, 2019 9:24 PM
Exit mobile version