महापालिकेत आजपासून बहरणार “पुष्पोत्सव”

महापालिकेत आजपासून बहरणार “पुष्पोत्सव”

नाशिक : महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने 24 ते 26 मार्चदरम्यान ‘पुष्पोत्सव 2023’चे आयोजन करण्यात आले आहे. या पुष्पोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पुष्पोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून सायकल रॅली काढण्यात आली होती.

एकेकाळी गुलशनाबाद म्हणून ख्यातकीर्त असलेल्या शहरात १९९३ पासून राजीव गांधी भवन इमारतीत पुष्पोत्सवाचे आयोजन केले जाते. या पुष्पप्रदर्शनात विविध प्रकारची फुले व झाडांचे प्रकार बघायला मिळतात. या पुष्प प्रदर्शनानिमित्त गुरूवारी (दि.२३) नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक पुष्प सायकल रॅली काढण्यात आली. पुष्पोत्सव व पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याहेतूने 40 सायकलस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला.

गाडगे महाराज पुलाजवळ सायकलस्वार एकत्र आले होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व उद्यान उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. आयुक्तदेखील सायकलवर रॅलीत सहभागी झाले होते. स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, फुलांचे नाशिक, असा नारा देत निघालेल्या सायकल रॅलीची सांगता राजीव गांधी भवनात झाली. सहभागी सर्व सायकलस्वारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनला राजीव गांधी भवनच्या भिंतीवर पहिले पुष्प गुंफण्याचा मान मिळाला. संस्थेचे अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिव अविनाश लोखंडे, संस्थेचे सुरेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ. मनीषा रौंदळ, एस. पी. आहेर, डॉ. नितीन रौंदळ, नरेश काळे, रामदास सोनवणे, अनुराधा नडे, दिलीप देवांग, मेघा सोनजे, अश्विनी कोंडेकर, कारभारी भोर, अरविंद निकुंभ, मनोज गायधनी, मनोज जाधव आदींचा आयुक्तांनी सन्मान केला. रॅलीचे नियोजन साधना दुसाने, अमित घुगे यांनी केले. यावेळी सहाय्यक कनिष्ठ अभियंता वसंत ढुमसे, उद्यान निरीक्षक उद्धव मोगल, किरण बोडके, नानासाहेब पठाडे, प्रशांत परब, वैभव वेताळे, श्याम कमोद उपस्थित होते.

सेल्फी पॉईंट आणि संगीत, नृत्याची मैफल

राजीव गांधी भवनात शुक्रवारी (दि.24) ‘पुष्पोत्सव 2023’चे उद्घाटन होणार आहे. ‘नृत्य-रंगवेध’ या नृत्यांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. 25 ला ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. या दिवशी अभिनेता चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव उपस्थित राहणार आहेत. 26 मार्चला विजेत्यांना ट्रॉफिज्चे वितरण हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सव 24 ते 26 मार्चदरम्यान सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी खुला असणार आहे. आतापर्यंत 577 प्रवेशिका आल्या आहेत. विशेष म्हणजे पुष्पोत्सवात सेल्फी पॉईंटही असणार आहे. ‘पुष्पोत्सव 2023’ निमित्त छायाचित्र स्पर्धेसह विविध स्पर्धा होणार आहेत. ‘पुष्पोत्सव 2023’ला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.

First Published on: March 24, 2023 11:37 AM
Exit mobile version