ऐन लॉकडाऊनमध्ये रेशनकार्ड पोर्टेबिलिटी बंद

ऐन लॉकडाऊनमध्ये रेशनकार्ड पोर्टेबिलिटी बंद

भिवंडीत धान्याचा काळाबाजार; नऊ टन रेशनिंगचे तांदूळ ताब्यात

लॉकडाऊनच्या काळात शिधापत्रिकाधारकांनाही अन्न व नागरी पुरवठा विभागाने पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे पात्र लाभार्थींना शहरातील कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेण्याची मुभा मिळाली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ही सुविधाच बंद झाल्याने नागरिकांना धान्य मिळणेही दूरापास्त झाले आहे. परिणामी ऐन संकटाच्या काळात रेशन दुकानदार व नागरिकांमधील वादाचे प्रसंग वाढले आहेत.

लॉकडाउनच्या काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला आता रेशन दुकानांमधून मिळणार्‍या धान्याचाच आधार आहे. याकरिता राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. नियमित धान्यासह मोफत तांदुळही वितरित करण्यात येत आहे. लवकरच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्याचे वितरण सुरू होईल. नियमित रेशनकार्डधारकांसह पोर्टबिलिटीव्दारेही नागरिकांना धान्य वितरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात गेलेल्या नागरिकांना या सुविधेमुळे धान्य उपलब्ध करून देण्यात आले. पुरवठा विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार आतापर्यंत लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख २३ हजार ७१५ स्थलांतरित शिधापत्रिकाधारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले आहे. तर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५५ हजार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यासाठी रेशन दुकानदारांना धान्य वितरणासाठी देण्यात आलेल्या पॉस मशिन सिस्टिममध्येही बदल करण्यात आला. मात्र, दोन दिवसांपासून पोर्टेबिलिटी सुविधाच बंद झाल्याने धान्य घेण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना दुकानदारांनी धान्य देण्यास नकार दिला. त्यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहे. सिस्टिममध्येच पोर्टेबिलिटीचा पर्याय दाखवत नसल्याने आम्ही धान्य देणार तरी कसे, असा सवाल रेशन दुकानदारांकडून उपस्थित होत आहे. यंत्रणेच्या अशा कारभारामुळे स्थलांतरित नागरिकांचे मात्र नाहक हाल होत आहेत.

सिस्टिममध्ये पर्यायच नाही

शासन आदेशानुसार आतापर्यंत शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीव्दारे धान्य वितरण करण्यात येत होते. त्यासाठी दुकानदारांकडील सिस्टिममध्येही बदल करण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांपासून हा पर्यायच सिस्टिममध्ये दिसत धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्ये वाद निर्माण होत आहेत.

निवृत्ती कापसे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटना

सर्व्हर डाऊन

सर्व्हरच्या अडचणींमुळे नाशिकमध्येच नव्हे तर राज्यभरात पोर्टेबिलिटी सुविधेत अडसर निर्माण झाला आहे. याबाबत एनआयसीला कळविण्यात आले आहे. दोन ते तीन दिवसांत तांत्रिक दोष दूर करून ही सेवा पूर्ववत होईल. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ५५ हजार नागरिकांना पोर्टेबिलिटीव्दारे धान्य वितरीत करण्यात आले आहे.

अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

First Published on: April 24, 2020 7:11 PM
Exit mobile version