नाशिक महापालिकेत ३ हजार जागांसाठी मानधनावर भरती

नाशिक महापालिकेत ३ हजार जागांसाठी मानधनावर भरती

महापालिकेच्या विविध आस्थापनांमधील रिक्त असलेल्या सुमारे ३ हजार जागांसाठी मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.१८) झालेल्या विशेष महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या भरती प्रक्रियेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचं सांगत विरोधकांनी या प्रस्तावाचा कडाडून निषेध केला.

महापालिकेचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. १९९८ पासून महापालिकेने भरती केलेली नाही. त्यामुळे ही भरती आवश्यक असल्याचं महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागात ७९७ घंटागाडी कर्मचारी व सुमारे ७०० स्वच्छता कर्मचारी, तर आरोग्य विभागात एकूण ३७१८ कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.आवेश पलोड यांनी सभागृहात दिली. शिक्षण विभागात एकही कंत्राटी कर्मचारी नसून, २०१७ च्या संच मान्यतेनुसार १९३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एकूणच, महापालिकेतील विविध संवर्गात सुमारे तीन हजार जागा रिक्त आहेत. त्यासाठी मानधन तत्त्वावर ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाणार आहे.

वॉटरग्रेसच्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

शहरातील स्वच्छतेचा ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदाराने मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा प्रकार महासभेदरम्यान पुढे आला. ठेकेदाराने त्याच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात हा भ्रष्टाचार केला असून, यासंदर्भातला अहवाल पुढच्या महासभेत सादर केला जाणार आहे.

First Published on: November 17, 2021 6:41 PM
Exit mobile version