साडेतीन कोटींचा चोरीचा मुद्देमाल जप्तीनंतर मूळ मालकांना परत

साडेतीन कोटींचा चोरीचा मुद्देमाल जप्तीनंतर मूळ मालकांना परत

अनेकांची दिवसरात्र कष्ट करून जमविलेली रक्कम, मोठ्या हौशेने खरेदी केलेली दुचाकी, मोबाईल, सौभाग्याचे लेणेच चोरीला गेले होते. ते परत मिळेल की नाही याची नागरिकांना चिंता होती. पण, नाशिक शहर पोलिसांनी चोरीला गेलेला तब्बल ३ कोटी ५० लाख ९० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नागरिकांना परत केला. नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यांवर एक वेगळाच आनंद दिसून आला. मुद्देमाल परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

घरफोडी, दुचाकी व मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी अशा विविध गुन्ह्यातील जप्त केलेला ३ कोटी ५० लाख ९० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी (दि.१२) पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते नागरिकांना प्रदान करण्यात आला.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार वर्षभरातील मालेमत्तेविषयक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी ३ कोटी ५० लाख ९० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तक्रारदार अर्चना धात्रक, कल्पना क्षीरसागर, संदिप जगताप. ईश्वर गुप्ता, वामन निकम, विशाल शर्मा, समीना शेख, किशोर जोशी, बबन बोराडे, प्रकाश भारती यांनी मनोगत व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. यावेळी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे आदी उपस्थित होते.

जप्त केलेला मुद्देमाल

वस्तू रक्कम
सोने व चांदीचे दागिने २९ लाख ७६ हजार रुपये
दुचाकी ४० लाख ५० हजार रुपये
मोबाईल ३ लाख २ हजार रुपये
रोख रक्कम २ कोटी ७५ लाख ८२ हजार ५५० रुपये
एकूण ३ कोटी ५० लाख ९० हजार ६५० रुपये

First Published on: October 12, 2021 7:44 PM
Exit mobile version