वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून बंद!

वाढत्या कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून बंद!

राज्यातील आदर्श शाळांसाठी ५३ कोटीचा निधी

महाविद्यालयांपाठोपाठ आता जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून (दि.१०) बंद करण्याचा निर्णय नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. मात्र, इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात होत असल्याने हे वर्ग नियमितपणे सुरु ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. ऑफलाईन शाळा बंद होत असल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरुच राहणार आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी शाळांविषयीचा निर्णय जाहीर केला. पालकमंत्री भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात २८ डिसेंबर २०२१ रोजी अवघे ४२१ कोरोना रुग्ण होते. ही संख्या ५ जानेवारी २०२२ रोजी १४६१ पर्यंत पोहोचली आहे. यात १४ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून, एका बालकाला ओमायक्रॉन संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग  लक्षात घेता पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरांप्रमाणेच नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवार (दि. १०) पासून ते ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग मात्र नियमितपणे सुरु राहतील. ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ जानेवारीनंतर परिस्थिती बघून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात साडेपाच लाख विद्यार्थी

जिल्ह्यात ३२६३ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये २ लाख ६५ हजार ८९५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तर खासगी व जिल्हा परिषदेच्या एकूण ६६३ माध्यमिक विद्यालयांमध्ये २ लाख ४१ हजार २३४ विद्यार्थी आहेत. शहरातील मराठी, इंग्रजी व इतर माध्यमाच्या शाळांमध्ये साधारणत: दीड लाख विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सोमवारपासून बंदी घातली आहे.

First Published on: January 6, 2022 6:11 PM
Exit mobile version