संजय राऊतांच्या समर्थनार्थ नाशकात शिवसेनेचे निदर्शने

संजय राऊतांच्या समर्थनार्थ नाशकात शिवसेनेचे निदर्शने

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधील कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध नोंदवला. ईडीविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी ही कारवाई मागे घेण्याची मागणी केली.
शालिमार चौकातील शिवसेना कार्यालयासमोर सोमवारी (दि.1) शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक ईडीला कधीही घाबरला नाही. अटक व्हायलाही घाबरणार नाही. शिवसेना आयुष्यात सोडणार नाही, असा फलक हाती घेवून शिवसैनिकांनी हे आंदोलन केले.

जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी जिल्हाप्रमुख करंजकर म्हणाले की, ‘ईडी’सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी ऊसने पैसे घेतल्याचे कारण पुढे करून त्यांना अटकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला. खासदार राऊत यांना चुकीच्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून गुंतवण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. या सर्व प्रकारामागे भाजपचा हात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे, सचिन मराठे, सुनील जाधव यांसह महिला कार्यकारिणीच्या सदस्या व शिवसैनिक उपस्थित होते.

First Published on: August 2, 2022 1:10 PM
Exit mobile version