लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात कडकडीत बंद

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात कडकडीत बंद

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यात आज महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ८ वाजता सटाणा शहरात फिरुन महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्यानंतर सकाळी १० वाजता नायब तहसीलदार बहीराम यांना सटाणा बसस्टॅण्ड येथे निवेदन देण्यात आले. यावेळी सटाणा पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. लासलगाव, निफाड, विंचूर, उमराणेमधील सर्व बाजारपेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट होता.

माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे जयप्रकाश सोनवणे, काँगसचे किशोर कदम यांच्यासह मित्रपक्षांच्या नेतृत्वाखाली सुमारे २५ कार्यकर्त्यांनी निषेधार्थ कडकडीत बंद पाळत घटनेचा निषेध केला. लखीमपूरमध्ये शांततामय मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर केंद्र सरकारमधील भाजपच्या मंत्री पुत्राने व त्याच्या सहकार्यांनी गाडीने आंदोलनकर्त्यांना चिरडले. या घटनेला ५ दिवस उलटून गेले तरी केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

First Published on: October 11, 2021 11:56 AM
Exit mobile version