हरियाणाहून मुंबईकडे जाणारा संशयास्पद कंटेनर पकडला, त्यात सापडला ‘इतका’ मोठा गुटख्याचा साठा

हरियाणाहून मुंबईकडे जाणारा संशयास्पद कंटेनर पकडला, त्यात सापडला ‘इतका’ मोठा गुटख्याचा साठा

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर इगतपुरी पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी 10 वाजता सापळा रचून हरियाणाहून मुंबईकडे 80 लाखांचा अवैध गुटखा घेऊन जाणारे दोन कंटेनर जप्त केले. पोलिसांनी कंटेनरचालकांना अटक केली आहे. दोन्ही चालक सख्खेभाऊ असून, ते अनेक वर्षांपासून गुटख्याच्या कारभारात असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपासी पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. कंटेनरचालक सलमान अमीन खान (वय ३०) व इरफान अमीन खान(वय ३१ रा. नखरोला, हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना १५ दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरून अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस अधीक्षक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोलीस हवालदार किशोर खराटे, चेतन सवस्तरकर, दीपक अहिरे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देसले, मुकेश महिरे, राहुल साळवे, विजय रुद्रे, अभिजीत पोटींदे, गिरीश बागूल, विनोद टिळे, निलेश देवराज यांनी सापळा रचला.

पोलिसांना शुक्रवारी (दि.२६) मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रिंप्रीसदो चौफुलीवर येथे मुंबईकडे जाणार्‍या दोन कंटेनरची तपासणी केली. त्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. पोलिसांनी दोन कंटेनरमधून ८० लाखांचा गुटखा जप्त केला. या कंटेनरमध्ये 4 के स्टार, एसएचके या कंपनीचा गुटखा होता. पोलिसांनी गुटखा व दोन कंटेनर (एचआर 38, झेड-3937) व (एचआर 47, ई-9140) असा एकूण १ कोटी २८ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

First Published on: May 27, 2023 12:50 PM
Exit mobile version