खतांचे लिंकिंग करणार्‍यांवर कारवाई करा

खतांचे लिंकिंग करणार्‍यांवर कारवाई करा

नाशिक : रासायनिक खतांसोबत इतर खतांचे लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती संजय बनकर यांनी दिली. सभापती बनकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२३) जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्यासमवेत खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी व तालुकास्तरीय कृषी अधिकारी पंचायत समिती यांची खरीप हंगामपूर्व बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरसीएफ झुआरी, इफको, कृभको, कोरोमंडल व इतर खत उत्पादक व पुरवठादार कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.

सभापती बनकर यांनी  एप्रिल व मेमध्ये खताचे शासनाकडून मिळालेल्या मंजूर वितरण (आवंनटन)नुसार  झालेल्या पुरवठ्याची माहिती घेतली. त्यात आरसीएफ,कृभको व झुआारी या कंपन्यांनी युरिया खताच्या वितरण(आवंटन) प्रमाणे पुरवठा केल्याचे आढळून आले.इफको,कोरोमंडल,स्पाईक,जीएनव्हिएफसी या कंपन्यांनी शासनाकडून मंजूर केलेल्या आवंटनानुसार पुरवठा न केल्याने त्यांना या महिनाअखेर आवंटनानुसार खत पुरवठा करण्याबाबत सूचना सभापती बनकर यांनी यावेळी केल्या.तसेच युरिया खतासोबत इतर जैविक खते व विद्राव्य खते यांची विक्री शेतकऱ्यांना आवश्यक असल्यासच करण्यात यावी. कोणतीही सक्ती शेतकऱ्यांना कृषी विक्री केंद्र व खत कंपन्या यांच्याकडून करण्यात येऊ नये,अशा स्पष्ट सूचनाही सभापती बनकर यांनी या बैठकीत दिल्या .जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या करण्यात येऊन अशी बाब निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सभापती बनकर यांनी दिले. खत कंपनी प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांना आवश्यकता नसल्यास कोणत्याही खताची विक्री अथवा लिंकिंग करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले.

First Published on: May 23, 2020 3:29 PM
Exit mobile version