चाकू धाक दाखवून महिलेचा मोबाईल हिसकावणार्‍या गुन्हेगारास अटक  

चाकू धाक दाखवून महिलेचा मोबाईल हिसकावणार्‍या गुन्हेगारास अटक  

अंधाराचा गैरफायदा घेत सोसायटीच्या पार्किंगमध्ये चाकूचा धाक दाखवत महिलेच्या मोबाईल हिसकावणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने अवघ्या २४ तसांत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळेमधील पारदेश्वर मंदिर परिसरातून गुन्हेगारास अटक केली. न्यायालयाने त्यास एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मयूर गजानन वांद्रेकर (वय२६, रा. यशोधन डी, रुम नं. १, मराठी शाळेच्या बाजूला, शिवाजीनगर, नाशिक) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कार्तिकी अंबादास आहिरे २३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता दूध खरेदीसाठी अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर येथील दर्शील अपार्टमेंटच्या पार्किगमधून पायी जात होत्या. त्यावेळी पार्किंगमध्ये लपून बसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर वांद्रेकर याने अंधार असल्याने गैरफायदा घेत कार्तिकी आहिरे यांना चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्याने त्यांच्या हातातील वियो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी आहिरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.

पोलीस तपासात संशयित वांद्रेकर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे लपून बसल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सुजित जाधव यांना मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना सांगितली. त्यानुसार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचला. पथकाने वांद्रेकर यास पारदेश्वर मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. पथकाने त्यास पोलीस ठाण्यात आणत चौकशी केली असता त्याने मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या ताब्यातून मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे करीत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, पोलीस हवालदार गिरीष महाले, गणेश रहेरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव यांनी केली.

First Published on: February 29, 2024 4:32 PM
Exit mobile version