प्लास्टिकविरोधात थिंक आऊटसाईड, ट्रॅश रिसायकल उपक्रम प्रारंभ

प्लास्टिकविरोधात थिंक आऊटसाईड, ट्रॅश रिसायकल उपक्रम प्रारंभ

नाशिक : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयएल) ची यंग इंडियन्स (व्हीआय) ही युवा आघाडी असून, त्यांच्या नाशिक चॅप्टरतर्फे कचर्‍याच्या बाहेर विचार करा; पुनप्रक्रिया करा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहरातील हॉटेल्स रेस्टॉरंट्सद्वारे उत्पादित प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी शहरातील उपाहारगृहांना प्लॅस्टिक जमा करण्यासाठी स्वतंत्र इस्टबिन देऊन ही मोहीम सुरू करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी आसाराम बापू पुलाजवळ सर्व सदस्यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा शुभारंभ झाला.

या वेळी चॅप्टरचे सहअध्यक्ष वेदांत राठी, क्लायमेट चेंज अध्यक्ष रोहन भिंगे, क्लायमेट चेंज सहअध्यक्ष हर्षित पहाडे, साहिल न्याहारकर, आनंद राठी, कैलास गुरनानी, सुमीत तिवारी आणि इतर सदस्य उपस्थित होते. हा उपक्रम नाशिक विभागाने २०२२ च्या हवामान बदलाच्या आपल्या उद्दिष्टांतर्गत सुरू केला आहे. यंग इंडियन्स नाशिकने शहरातील अनेक रेस्टॉरंटसना त्यांच्या प्लॅस्टिक कचर्‍यावर पुनर्प्रक्रिया करण्यास मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक रेस्टॉरंट्समधून कचरा गोळा केला जाईल. त्यावर एकत्रितरित्या प्रक्रिया केली जाईल. यंग इंडियन्स नाशिकने शहरातील किमान १०० रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात व्हेज अरोमा रिव्हर डाइन, स्पाइस रूट या रेस्टॉरंट्सनी सहभाग घेतला आहे. नाशिक शहरातील इतर रेस्टॉरन्ट्सनीसुद्धा या सामाजिक कार्यात हातभार लावावा असे आवाहन नाशिक चॅप्टरतर्फे करण्यात आले आहे.

First Published on: August 18, 2022 12:39 PM
Exit mobile version