इटलीच्या पाहुण्यांना देवळ्याच्या शेतीची भुरळ

इटलीच्या पाहुण्यांना देवळ्याच्या शेतीची भुरळ

देवळा : इटली येथील शिष्टमंडळाने नुकतीच देवळा येथील प्रमोद मनोहर आहेर यांच्या कांदा, टरबूज, मका शेतीला भेट दिली. या भागातील शेतकर्‍यांच्या शेतीतील प्रयोग व पिकांचे त्यांनी कौतुक केले. गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादन घेणार्‍या देशांकडे शेतीमाल आयातदार देशांचे विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर इटली येथील शिष्टमंडळाने आहेर यांच्यासह कि व्हिजन अ‍ॅग्रो प्रोड्यूसर्स कंपनीला भेट दिली. शेतातील कांदा पिकातील उत्कृष्ट शेती कामकाज, हाताळणी व साठवणूक व्यवस्थापन, कांदा चाळ याची पाहणी करत माहिती घेतली.

यावेळी कांदा पिकांसह विविध फळबागा पाहून त्यांना उत्कृष्ट कामाची भुरळ पडली. भारतीय कांद्याची चव, आकार यात वेगळेपण असल्याने शिष्टमंडळाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या थेट क्षेत्रावर जाऊन कांदा लागवड व्यवस्थापन, लागवड पद्धत, सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून उत्पादकता वाढ यासंदर्भातील माहिती घेत त्याचे तंत्र जाणून घेतले. याशिवाय, मका व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली.

पाहणी दौर्‍यानंतर आहेर कुटुंबीयांनी त्यांचे आदरातिथ्य केले. त्यांचा सत्कार करत अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी त्यांना दिली. हा आदरभाव पाहून शिष्टमंडळ भारावले व त्यांच्या कुटुंबाचे आभार मानत निरोप घेतला. यावेळी राजीव पगार, प्रमोद आहेर, जयेश शिंदे, दिनेश पगार, सम्राट वाघ, तुषार आहेर, शरद आहेर , तेजस आहेर , विनोद आहेर, उत्तम आहेर, पंकज सावकार, शरद खैरनार आदी उपस्थित होते.

First Published on: March 9, 2023 1:06 PM
Exit mobile version