अनिल परब प्रकरणाच्या चौकशीत चार भिंतीच्या आड काय झाले?

अनिल परब प्रकरणाच्या चौकशीत चार भिंतीच्या आड काय झाले?

प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकार्‍यांच्या बदल्या, प्रतिनियुक्ती व पदोन्नतीमध्ये 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप प्रकरणी तीन दिवसांत नाशिक शहर पोलिसांनी सहा अधिकारी, चेक पोस्ट आणि दोन खासगी एजंट्स यांची चौकशी केली. १० दिवसांत पोलिसांनी २५ शासकीय व ६ एजंट्सची चौकशी करून जबाब नोंदवून घेतले आहेत. विशेष म्हणजे, पोलीस तपासाची दिवसेंदिवस व्याप्ती वाढत असून, चौकशीची दुसर्‍यांदा वाढवलेली मुदत संपली आहे. मात्र, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी चौकशीसाठी मुदतवाढ दिली नाही. रविवार (दि.६)अखेर चौकशी अंतिम टप्प्यात आली नाही. पोलिसांनी पुन्हा काही नवीन अधिकारी व खासगी व्यक्तींना समन्स बजावले आहेत. परिणामी, पोलीस चौकशी कधी पूर्ण होईल, पोलीस आयुक्त पाण्डेय याबाबत काय अहवाल सादर करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

परिवहन विभागात 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि.४) पुन्हा चार मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ कार्यालय आणि चेक पोस्टवरील तीन खासगी एजट्सची चौकशी करण्यात आली. खासगी व्यक्तींमार्फत अधिकारी कशाप्रकारे वसुली करतात, याची दिवसभरात चौकशी करण्यात आली. शनिवारी (दि.५) दिवसभरात दोन नवीन मोटार वाहन निरीक्षक व दोन खासगी व्यक्तींची चौकशी करत जबाब नोंदवण्यात आले. तर रविवारी (दि.६) सुटीच्या दिवशीही पोलीस आयुक्तालयात आरटीओ भ्रष्टाचार आरोपप्रकरणी चौकशी सुरु होती. यामध्ये नवीन मुद्दे उपस्थित झाल्याने पोलिसाणी आणखी काही नवीन अधिकारी व खासगी एजंट्सना चौकशीस हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांकडून गोपनीयता ठेवून सखोल चौकशी केली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व एजट्सचे धाबे दणाणले आहे.

First Published on: June 6, 2021 9:30 PM
Exit mobile version